नांदेड| दि.16 ते 31 ऑगस्ट या दरम्यान नांदेड जिल्ह्यात हत्तीरोग रूग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असून या काळात जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी,आशा, स्वयंसेवक घरोघरी भेट देऊन हत्तीपाय व अंडवृद्धी रूग्णांची नोंद घेणार आहेत.


या अनुषंगाने भर पावसात दि. 16 ऑगस्ट रोजी डॉ. संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी जलधारा ता.किनवट येथील हत्तीरोग दुषित रूग्णास भेट देऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले की, सर्वांनी आपल्या जवळच्या आशा, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका यांना आपल्या हत्तीपाय व अंडवृद्धी आजाराची माहिती देऊन नोंद करून घ्यावी.



नोंद झालेल्या सर्व हत्तीपाय रूग्णाची तपासणी करून त्यांना अपंग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व अंडवृद्धी रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. हत्तीरोग आजाराचा प्रसार क्यूलेक्स या डासामार्फत होता व तो आजार न होण्यासाठी जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, नाल्या, गटार वाहती करून डास होणार नाहीत याची काळजी घ्यावी.


वर्षातून एकदा डीईसी व ऍलबेंनडाझाॅल गोळ्यांचे सेवन करावे असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड व डॉ के. पी. गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी किनवट, वाहन चालक गणेश अंबेकर हे उपस्थित होते.




