नांदेड | कोणतीही प्रसिद्धी, अपेक्षा किंवा लाभ न पाहता गेल्या ६२ महिन्यांपासून रस्त्यावरील भिकारी, अपंग, मानसिक रुग्ण आणि विस्कळीत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात “कायापालट” घडवणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्याबद्दल उद्योजक सुरेश पळशीकर यांनी,”कायापालटाचा करिष्मा करत ३ हजारांहून अधिक जणांचे जीवन पालटणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे जगातील एकमेव व्यक्तिमत्व असावे,” असे गौरवोद्गार काढले.


यंदाच्या ६२व्या महिन्यातील उपक्रमात ५७ भ्रमिष्टांना शहरातील विविध ठिकाणांहून गोवर्धन घाट येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणून, त्यांच्या केस-दाढी कापून, स्नान घालून, स्वच्छ कपडे परिधान करून त्यांचा सन्मानपूर्वक कायापालट करण्यात आला. यावेळी प्रत्येकाला ₹१०० रोख बक्षीसही देण्यात आले. आतापर्यंत सुमारे ३००० पेक्षा जास्त भणंगांचे कायापालट या उपक्रमातून झाले आहेत.



भाजपा, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, सन्मित्र फाउंडेशन, अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. या कार्याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.



उपक्रमातील सहभाग
सकाळी ६ वाजता सुरेश शर्मा, संजयकुमार गायकवाड, शिवा लोट यांनी भ्रमिष्टांना दुचाकीवरून आणले. यावेळी भ्रमिष्टांची संख्या वाढल्याने श्रीकांत, व्यंकटेश आणि प्रसाद या तीन स्वयंसेवकांनी अत्यंत दक्षतेने सर्वांची कटिंग-दाढी केली. स्नानासाठी पाण्याची व्यवस्था कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केली होती.सुरेश पळशीकर,स्नेहलता जायस्वाल, जयश्री ठाकूर यांच्या हस्ते नव्या अंडरपँट, बनियन, टी-शर्ट आणि पँटचे वाटप झाले. डॉ. दी. बा. जोशी व डॉ. अर्जुन मापारे यांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले. कार्यक्रमानंतर संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.

आव्हान आणि पुढील दिशा
यापुढे नांदेड शहरात कुठेही असहाय्य, कचरा वेचणारी, वेडीवाकडी, भिकारी अथवा अपंग व्यक्ती दिसल्यास भाजपा किंवा लायन्स क्लब सदस्यांना माहिती देण्याचे आवाहन संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी पुढील उपक्रम होणार आहे.गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून अखंडितपणे आणि निःस्वार्थपणे राबवला जाणारा हा उपक्रम समाजातील मानवी संवेदना जागवणारा एक आदर्श ठरत आहे. अनेक सामाजिक संघटना, व्यक्ती आणि जनतेकडून या कार्याची प्रशंसा होत आहे.


