हदगाव, शेख चांदपाशा| संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी आपले दस्तऐवज, बँक तपशील किंवा आधार प्रमाणीकरण संबंधित आवश्यक प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात. अन्यथा पुढील निवृत्तीवेतन अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


डिसेंबर 2024 पासून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अनुदान थेट डीबीटी (DBT) पोर्टलमार्फत आधार लिंक असलेल्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.


मात्र, अनेक लाभार्थ्यांचे खालील त्रुटींमुळे अनुदान जमा होत नाही: आधारप्रमाणीकरण (व्हेरिफिकेशन) पूर्ण झालेले नाही. खात्याच्या क्रमांकासोबत आधार क्रमांक लिंक नाही. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेले नाही. या त्रुटींमुळे लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. तरी अशा लाभार्थ्यांनी आपले ई-आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर संजय गांधी विभाग, तहसील कार्यालय हदगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




