जिने वाहिले नऊ मास ओझे….
जिने चिंतीले नित्य कल्याण माझे….
जिला मोद होतो देखोनी बाललीला ….
नमस्कार माझा जन्मदात्या माऊलीला ….


8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने तुझं सगळीकडे कौतुक होईल. शेजारीपाजारी, मित्र आप्तेष्ट, तुला भरभरून शुभेच्छा देतील, तुझा उर अभिमानाने भरून येईल, तुला कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. माझ्या सारखं कोणीही नाही. माझ्यामुळेच घर चालतं. मीच घरात सर्वश्रेष्ठ आहे असं वाटेल.

पण सखी तुला खरच एक कानमंत्र देते. या महानपणाच्या, स्त्री पुरुष समानतेच्या पायदळी तुझा साजरा संसार, तुझी चिमुकली पिलं यात भरडली जाणार नाहीत याचं भान ठेव…. तुला खरच माझा राग येईल
एक स्त्री असून प्रवाहाच्या विरुद्ध काय बोलते, स्त्री-पुरुष समानतेच्या युगात नमतं घ्यायला काय सांगते असंच वाटेल तुला.

पण सखी तुला खरं सांगू बदल अचानक घडत नसतात. त्याला युगे लोटावी लागतात. पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजोबाच्या काळी आजी आजोबांना एकत्र कुटुंबामध्ये फारसं बोलता सुद्धा येत नसे. घरामध्ये एकच कुटुंब प्रमुख असायचा त्याच्या सल्ल्याने संपूर्ण घर चालायचं सहाजिकच सर्वांना आपले विचार मांडता येत नसत. स्त्रियांनी घरातील कामे करावी व पुरुषांनी शेतीची, व्यवहाराची कामे करावी अशी प्रथा प्रचलित होती त्यामुळे आपसूकच परावलंबित्व स्त्रियांच्या माथी असायचं.

काळ पुढे लोटला अनेक समाजसुधारकांनी यात खोडा घातला. स्त्री चूल आणि मुल, या बंधनातून बाहेर आली. व शिक्षण शिकू लागली. साहजिकच आई-बाबांच्या वेळी थोडी स्वतंत्रता आली. माज घरातील स्त्री ओसरी वर येऊन आपले विचार मांडू लागले तिचे क्षेत्र विस्तारले गेले . घर कामात थोडीशी पुरुषांचीही मदत होऊ लागली.
त्यानंतरचा आपला काळ. आपण शिक्षणात प्रगती करू लागलो पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी व्यवसायात भरभक्कम पणे पाय रोउ लागलो पण आपण स्वीकारलेलं आपलं स्वयंपाक घर मात्र आपल्याला सोडता आलं नाही. आला गेला, पै- पाहुणा, घरातील सर्वांच आजारपण सांभाळत नोकरी व्यवसाय सांभाळणं आपल्या नाकीनऊ येऊ लागलं. सहाजिकच आपण नोकरी करून आपल्या संसाराला हातभार लावतो त्याप्रमाणे आपल्या सहचाऱ्या नेही आपल्या कामात मदत करावी अशी आपली भूमिका होऊ लागली. काही जण जशी झेपेल,तशी जशी जमेल तशी मदतही करू लागले . आपल्याकडे पैशातही स्वातंत्र्य आलं. आपल्याला थोडं फार आपल्या मनाप्रमाणे वागता येऊ लागलं पुरुषप्रधान संस्कृतीने हे ही सर्व बदल स्वीकारले.
पण तरीही तू ना खुशच. तुला तुझ्या बरोबरीने, तुझ्या यजमानाने मुलाबाळांचा आजारपण असो, वडीलधाऱ्यांची सेवा असो, किंवा घर काम असो तुला मदत करावीशी वाटते. तुझं अगदी योग्य आहे. पण समाज मनात रुजलेल्या चालीरीती, रूढी परंपरा एकदम बदलत नसतात, बदल आपल्या वागण्याने, चांगल्या स्वभावाने घडवून आणायचे असतात आणि हे सर्व करत असताना समानतेच्या अट्टाहासाने, तुझ्या संसाराला कुठेतरी तडा जाईल, गालबोट लागेल, आणि तुझी छोटीशी पिल यात भरली जाणार नाहीत याचा विचार कर. तुझ्या प्रेमळ स्वभावाने घरातील सर्वांची मने हळूहळू बदलली जातील, पण लगेचच माझ्या मनासारखं झालं पाहिजे या अट्टाहासाने एकटी पडू नकोस. बाकी सर्व क्षेत्र गाजवलेली तु, आकाशाला गवसणी घालणारी तु समंजस आहेसच.
तुझी शुभचिंतक..एक सखी..प्रेमला साकोळकर, गुजराती प्राथमिक शाळा,नांदेड