नांदेड l जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुटूंर तांडा येथील गैरव्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत पोलिसांना केंद्राच्या आसपास असणाऱ्या काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तर गोंधळाला नियंत्रीत न करू शकल्याबद्दल केंद्र संचालक व कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.


यासोबतच परीक्षा केंद्रावरील गर्दी पाहून तिव्र शब्दात केंद्र संचालक व पोलीस यंत्रणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. याठिकाणच्या केंद्रचालकांना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत. तर या परिसरातील जबाबदारी असणाऱ्या बैठेपथकातील सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

केंद्रसंचालकास बदलविण्यात आले असून या परीक्षा केंद्राचा प्रभार दुसऱ्या मुख्याध्यापकाकडे देण्यात आला आहे. याशिवाय आज माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी माळाकोळी व लोहा येथील केंद्रांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोड यांनी बिलोली तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान कारवाई केली होती. परीक्षा संदर्भात जिल्ह्यात कुठेही गोंधळ चालणार नाही याबाबत त्यांनी पुन्हा एकदा यंत्रणेला ताकीद दिली आहे.
