नांदेड | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 26 ऑक्टोंबर 2024 शनिवार रोजी आगाराचे वाहतुक नियंत्रक श्री सुनील मोरे यांच्याकडून सामाजिक उपक्रम म्हणून एसटीच्या आगारातील कामगार- कर्मचार्यांना भारतीय संविधान ग्रंथाचे वाटप आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात पाळी प्रमुख मनोहर माळगे, लिपीक सौ. मनिषा कदम, रेखा माचीनवार, चालक केशव कांबळे, यांत्रिक यशोदिप अटकोरे यांचा समावेश होता.
यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन आपले विचार मांडले. ते प्रास्ताविकपर बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, भारतरत्न, प.पू., बोधिसत्व, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान या ग्रंथामुळे आज आपला भारत देश एकसंघ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 आंतरराष्ट्रीय देशाच्या कायद्याचा अभ्यास करुन 40 हजार पुस्तकांचे वाचन करुन ही राज्यघटना लिहिली आहे, असे प्रतिपादन केले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर या संविधान ग्रंथाची निर्मिती केली असून आपण प्रवाशी सेवेबरोबरच आपल्या कुटुंबियांसहीत संविधानाचे वाचन केले पाहिजे व सजग राहून या संविधानाचे रक्षण करण्याप्रती समाजासाठी, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची नितांत गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, श्रीनिवास रेणके, पाळी प्रमुख मनोहर माळगे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक नियंत्रक सौ. पायल बैस, सुनील मोरे, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, गुलाम रब्बानी, केशव टोणगे, लिपीक प्रियंका खरात, वैष्णवी गंदेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार- कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.