नांदेड, दत्ता शिराणे। राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने दिल्या जाणारा माध्यम क्षेत्रातील पुरस्कार जेष्ठ पत्रकार श्री संजिव कुलकर्णी आणि ग्रामीण भागातून डिजिटल मिडियात कार्यरत असलेल्या श्री अनिल मादसवार यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण आणि चळवळी योध्दा स्व. बसवंतराव मुंडकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन 4 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिवदास हमंद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने सामाजिक जाणिव असलेला कार्यप्रवण माध्यम प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधीक स्वरुपात दिल्या जाणारा 2023- 24 या वर्षाचा पत्रकार पुरस्कार पत्रकारितेच्या क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार श्री संजिव कुलकर्णी आणि नांदेड जिल्ह्यात डिजिटल मीडियाची ओळख करून देणारे ग्रामीण भागातील युवा पत्रकार श्री अनिल मादसवार यांना घोषित झाला आहे.
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रम राज्य मराठी पत्रकार परिषद यांच्या पुढाकाराने आणि स्व. बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड यांच्या सौजन्याने आखण्यात आला आहे. या कालावधीत मराठवाड्याच्या विकासाचे विविध प्रश्न, मृत अवस्थेतील वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा मुक्ती संग्रामातील चळवळी योध्दयांसंबंधीची अनास्था, उपेक्षित चळवळी योध्दे, दुरावस्थेतील हुतात्मा स्मारके यावर प्रकाश टाकण्यात आला.
याबाबत ठिकठिकाणी जागर कार्यक्रम आखण्यात आले. याच बरोबर माजी खासदार आणि विविध लोक प्रतिनिधी तसेच मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष यांच्या मुलाखती घेवुन जागर कार्यक्रम पुढे नेण्यात आला. 03 ऑक्टोबर रोजी श्री स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्मदिन साजरा करुन 04 ऑक्टोबर रोजी स्व. बसवंतराव मुंडकर यांच्यावर आधारित ‘चळवळीतील उपेक्षित बाप माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी श्री संजिव कुलकर्णी आणि श्री अनिल मादसवार या पत्रकारांचा कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे, केद्रिय अध्यक्ष श्री मधुसुदन कुलथे हे राहणार आहे, तर विशेष अतिथी म्हणुन डॉ. व्यंकटेश काब्दे हे राहणार आहे. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामातील चळवळी योध्दे यांच्या कुटूंबियांचे प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळी विषयी आस्था असणाऱ्या आणि माध्यम क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. शिवदास हमंद, गोविंद मुंडकर, राजकुमार बिरला, डॉ.अनिल सिरसाट, संदिप महाजन, प्रदिप जैन, निरज अवस्थी, दिपक कसबे, सौ. स्मिता अवस्थी, डॉ. बालाजी पेनुरकर, सौ.शुभांगी पांडुरंग बळेगांवकर, ह. हफीज अ. कादर बागवान, साहेबराव जाधव यांनी केले आहे.