नांदेड। ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील सखल भागातील राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीतील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई पोटी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि ५० किलो ग्रॅमची रेशन किट देण्यात यावी अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्ताना प्रत्येकी दहा हजार रुपये मंजूर केले होते. शहरातील पूरग्रस्तांना नऊ कोटी रुपये मंजूर झाले होते.
जुलै २०२३ च्या धरतीवर यावर्षी रुपये २० हजार आणि रेशन किटची मागणी सीटूच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवेदन देण्यासाठी थांबलेल्या बैठक कक्षातील सीटूच्या कार्यकर्त्यांना स्वतः थांबून निवेदन स्वीकारले आणि मागच्या वर्षीसारखे यावर्षी होणार नाही, किंबहुना लवकरात लवकर पाहणी करून पंचनामे करण्यात येतील व सर्व पूरग्रस्तांना अनुदान वाटप करण्यात येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हाधिकारी महोदयांच्या आश्वासनामुळे शिष्टमंडळातील महिला पुरुष भारावून गेले आणि समाधान व्यक्त केले. मजदूर युनियनच्या वतीने पुढील चार दिवसात गेल्यावर्षी प्रमाणे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. खऱ्या नुकसानग्रस्ताना अनुदान मिळणार असून तातडीने अनुदान मिळाले नाही तर ९ सप्टेंबर रोजी सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त,तहसीलदार यांच्या सह पोलीस अधीक्षक आणि वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आले आहे. निवेदनावर सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.लता गायकवाड, प्रदीप सोनाळे, बालाजी नरवाडे, शेख युनूस, लतीफानिसा बेगम, प्रणिता वाघमारे, अरेफा बेगम, सना तबसूम, रहेमत खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशी माहिती सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.