किनवट, परमेश्वर पेशवे| भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या किनवट शाखेच्या एटीएममधील १७ लाख ३९ हजार पाचशे रुपयांची रोकड गायब करणारा मास्टरमाइंड बँकेचाच शिपाई असल्याचे शुक्रवारी दि. ९ पोलीस तपासात उघड झालेआहे. पोलिसांनी आरोपी शिपायाच्या घरातून तब्बल १० लक्ष ९९ हजार रूपये हस्तगत केले आहेत.
नांदेडच्या भाग्यलक्ष्मी बँकेच्या किनवट शाखा कार्यालयाजवळील एटीएममधून १७ लाख ३९ हजार पाचशे रूपयांची रोकड गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी दि. ६ उघडकीस आला. त्यानंतर बँक प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. शाखा व्यवस्थापक संजयकुमार इटकरे यांच्या तक्रारीवरुन गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी संशयित म्हणून बँक अधिकारी भारत सोनटक्के, जयंत कुलकर्णी, नारायण आडे, रोखपाल नामदेव गवळे, सुभाष टाक, शिपाई गीतेश बिमनेनीवार, माधव कल्याणकर व एटीएम गार्ड दिनेश मलकुवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांपैकी एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी मदत करणारा भाग्यलक्ष्मी बँकेचाच शिपाई गीतेश बिमनेनीवार याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एटीएममधून तब्बल १७ लक्ष ३९ हजार पाचशे रुपयांची रोकड पासवर्ड माहीत असल्याचा फायदा घेत गायब केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा गीतेश याच्या राहात्या घरातून १० लक्ष ९९ हजारांची रोकड हस्तगत केली. एटीएममधून रक्कम काढून घेतल्यानंतर आरोपी गीतेशने आदिलाबाद येथून ४ लक्ष ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणात आणखी ३ ते ४ आरोपी असू शकतात, अशी माहिती तपासीक फौजदार सागर झाडे यांनी दिली.