देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर आगारासाठी एस.टी महामंडळाने सहा नवीन एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत . दैनंदिन १६ हजार प्रवासी संख्या असलेल्या या आगारात सध्यस्थितीत ११६ वाहक चालक कार्यरत आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता १५० चालक वाहक असणे गरजेचे आहे. सहा गाड्यांमधील एक गाडी मानव विकास योजनेतून देगलूर आगाराला प्राप्त झाली आहे . सद्यस्थितीत देगलूर आगारात ६१ गाड्या असून या सहा गाड्यांची त्यामध्ये भर पडली आहे. यातील १२ गाड्या लांबपल्यांच्या प्रवासी सेवेसाठी राखीव असतात.


सहा वर्षापासून नवीन गाड्यांच्या प्रतीक्षेत…! तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश सीमेवर महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या देगलूर आगारात गेल्या सहा वर्षांपासून एकही गाडी नव्याने आलेली नव्हती. तालुक्यात असणाऱ्या ११० खेडी व वाडी तांड्यापर्यंत काही गावांना अद्यापही एसटी पोहोचलेलीच नाही. हे वास्तव यानिमित्ताने पुढे येत आहे.
ग्रामीण भागात बस स्थानके अतिक्रमणाच्या विळख्यात..
“हात दाखवा” गाडी थांबवा” हे ब्रीद घेऊन एसटीची वाटचाल सुरू असली तरी हात दाखवणाऱ्या प्रवाशांना थांबायला ग्रामीण भागात एसटी थांबेच उपलब्ध नाहीत. तालुक्यातल्या एकमेव करडखेड येथील “कंट्रोल पॉईंट” ही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला असल्याने प्रवाशांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

इलेक्ट्रिकल गाड्या केवळ दिवा स्वप्न…
देगलूर आगाराला १२ इलेक्ट्रिकल बस मिळणार असल्याचा गाजावाजा गेल्या कांही दिवसापासून केला जात आहे. त्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपये खर्च करून विद्युत चार्जिंग सेंटर उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. इलेक्ट्रिकल बस केव्हा येणार याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. त्यामुळे इलेक्ट्रिकल बस प्रवाशांना ” दिवा स्वप्न” ठरवू नये अशी अपेक्षा प्रवाशातून केली जात आहे.

नांदेडहून सायंकाळच्या गाड्या नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय.. ! मुखेड, बिलोली, कंधारया आजारातील गाड्या जशा सायंकाळी नांदेड वरून येतात तशा गाड्या देगलूरला येणे आवश्यक आहे सायंकाळी पाच नंतर कधीच उपलब्ध नसते त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाचा आसरा घ्यावा लागतो याकडे आगार प्रमुखांनी गंभीर्याने बघणे गरजेचे आहे.
