किनवट, परमेश्वर पेशवे| कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाशिवाय जिंकणे अशक्य आहे. कार्यकर्त्यांनो, पक्षातील नेत्यांना आपापसात भांडू द्या, तुम्ही मात्र एकसंघ राहून किनवट – माहूर विधानसभेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा,असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी दि.२९ येथे केले. विशेषतः या कार्यक्रमाप्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव के राम यांची अनुपस्थिती प्रामुख्याने दिसल्याने कार्यकर्त्यामध्ये चर्चेला उधाण आले होते.
भाजपातील अंतर्गत गटबाजीचे दर्शन सुद्धा याप्रसंगी रावसाहेब दानवे यांना बघायला मिळाले . भाजप नेते डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या वडिलाच्या निधनाबद्दल दानवे यांनी रविवारी सूर्यवंशी यांची सांत्वनपर भेट घेतली.त्यानंतर गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद सभेला त्यांनी मार्गदर्शन केले.सभेस डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी,डॉ.मोहन चव्हाण,कवळे,संध्या राठोड,दिनकरराव चाडावार,अशोक नेम्मानीवार,धरमसिंग राठोड,अनिल तिरमनवार, नारायणराव सिडाम, व्यंकटराव नेम्मानीवार,दीपक नेम्मानीवार,बाबूराव केंद्रे,प्रा.किसन मिराशे,बालाजी आलेवार, संतोष चनमनवार,आनंद मच्छेवार,उषा धात्रक,भावना दीक्षित, लता घाटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तालुकाध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार = रावसाहेब दानवे मार्गदर्शनासाठी उभे होताच त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष बालाजी आलेवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.किनवट तालुका कार्यकारिणीत महामंत्री, मंडळाध्यक्ष व चिटणीस किती ? ते संवाद सभेस गैरहजर कसे, असे विचारतानाच पुढील सभेत याबाबीचा आढावा घेणार असल्याचे नमूद केले.पक्षातील नेत्यांत गटबाजी कितीही असो,कमळ चिन्ह घेवून येणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा,असे सांगतानाच राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल,असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.प्रास्ताविकात श्रीनिवास नेम्मानीवार यांनी बूथरचनेची माहिती दिली. यावेळीअशोक पाटील सूर्यवंशी,अशोक नेम्मानीवार,संध्या राठोड, प्रा.मिरासे यांनीही मनोगत व्यक्त केले.उमाकांत कऱ्हाळे यांनी सूत्रसंचालन केले.