श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा येथील शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर वन्य प्राण्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २३ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वन्य प्राण्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.


माहूर व किनवट तालुका घनदाट जंगलाने व्यापलेला असून या परिसरात बिबट, अस्वल व अन्य वन्य प्राण्यांचा वावर आहे. मांडवी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बामनगुडा येथील शेतात लता सुरेश तोडसाम (वय ३५) या आपल्या पती, मुलगा व एका शेतशेजाऱ्यासोबत कापूस वेचण्याचे काम करीत होत्या. काही कामानिमित्त पती सुरेश तोडसाम घरी गेल्यानंतर शेताला लागून असलेल्या जंगलातून एका वन्य प्राण्याने अचानक झडप घालून महिलेवर हल्ला केला.

या हल्ल्यात महिलेच्या गालावर गंभीर जखम झाली असून कपाळावर व मानेवरही दात खोलवर रुतल्याने जीवघेण्या जखमा झाल्या. ही घटना पाहून मुलगा व शेजाऱ्याने जोरात आरडाओरड केल्याने वन्य प्राणी महिलेला सोडून जंगलात पळून गेला. त्यांच्या सांगण्यानुसार हा हल्ला बिबट्याने केल्याची चर्चा प्रथमदर्शनी झाली, त्यामुळे महिलेचा जीव वाचला.


घटनेची माहिती मिळताच पती सुरेश तोडसाम यांनी तात्काळ शेतात धाव घेत महिलेला घरी आणले व सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉ. बी. एम. मोरे यांनी प्राथमिक उपचार करून माहूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. माहूर येथे डॉ. मंगेश नागरगोजे, ब्रदर निलेश भिलावेकर व कक्षसेवक तुळशीदास शेंडे यांनी पुढील उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने १०८ रुग्णवाहिकेद्वारे डॉ. सत्यम गायकवाड यांच्या वैद्यकीय देखरेखीखाली व चालक सिद्धार्थ भालेराव यांच्या सहकार्याने महिलेला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले.


दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्याची चर्चा पसरताच प्रशासन खडबडून जागे झाले. सिंदखेडचे सपोनि रमेश जाधवर, दहेली वनपाल शहाजी डोईफोडे, वनरक्षक विशाल सोनुने व संतोष तिळेवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान जायमोक्यावर अस्वलाची ताजी विष्ठा आढळून आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेठवार यांच्याशी संपर्क साधला असता, सदर हल्ला अस्वलानेच केल्याचे प्राथमिक पुरावे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. कापूस पीक दाट वाढलेले असल्याने नेमका कोणता वन्य प्राणी होता, हे महिला शुद्धीवर आल्यानंतर तिच्या माहितीवरून स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणी संबंधित नातेवाईकांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आला असून शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही वनपरिक्षेत्र अधिकारी शिरसेठवार यांनी केले आहे. सदर हल्ला अस्वलानेच केल्याचा प्राथमिक निष्कर्ष वन विभागाने काढला असून, या घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

