किनवट, परमेश्वर पेशवे| अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवट द्वारे चालवण्यात येणाऱ्या संथागार वृद्धाश्रमामध्ये वयोश्री योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी समाज कल्याण आयुक्त शिवानंदन मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
65 वर्षे वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांना आवश्यक असणारे उपकरणे जसे की श्रवण यंत्र, चष्मा, ट्रायपॉड व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एक वेळ एक रकमे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ह्या कॅम्पसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नांदेड मार्फत श्रीमती अंजली नरवाडे, श्रिमती ममता गंगातीर, श्रिमती सिता काळे या उपस्थित होत्या. या शिबिराच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष किनवट/माहूर नगरीचे आमदार भीमरावजी केराम हे उपस्थित होते.
संथागार वृध्दाश्रमाचे संचालक मा.अरुण आळणे (माजी नगराध्यक्ष) यांच्या आवाहनाला परिसरातील वृद्धांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. या शिबिरात पाचशेच्यावर अर्ज स्विकारण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी किनवट नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अखिलेश पहुरकर, परिचारिका प्रिया घोगरे, परिचारिका सिमा बनसोड हे देखील उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संथागार परिवाराच्या प्रमुख करुणाताई आळणे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.आकांक्षा आळणे यांनी केले.