देगलूर, गंगाधर मठवाले| होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार जागृत झालेला आहे त्यामुळे रंगी बेरंगी झेंडे घेऊन सामान्य जनतेला विभागणार्या आणि पोकळ विकासाचे आश्वासन देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही तर पायाभूत विकासाचा अजेंडा चालविणार्यांनाच मतदान करणार आहे.त्यामुळे अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या कांग्रेस व भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणार असे प्रतिपादन प्रहार जनशक्तीचे प्रमुख व आमदार बच्चु कडू यांनी सुभाष साबणे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी देगलूर येथील आयोजित प्रचार सभेत केले.


यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, प्रहारचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, महानगराध्यक्ष प्रितपालसींह साहु यांची प्रमुख उपस्थिती होती. “शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची लढाई गेल्या ७५ वर्षांपासून आपण लढतो आहोत.माझ्यावर ३०० च्या वर गुन्हे दाखल आहेत अजूनही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मानसन्मान भेटत नाही. शेतकऱ्यांना अजून आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे आता ही बदल्याची भावना निर्माण होत आहे.


आता येणारी ही निवडणूक बदला घेणारी असेल. ज्यांनी-ज्यांनी धर्म आणि जात सांगून आमचे मत घेतले त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही. सोयाबीनचे हमी भाव सात हजार सांगुन प्रत्यक्षात मात्र चार हजाराच्या कवडीडीमोल भाव देऊन आम्हाला ज्यांनी ज्यांनी रडवलं मग काँग्रेस असूद्या अन्यथा भारतीय जनता पक्ष. गेल्या ७५ वर्षात भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी राज्य केलं. दोघांनीही आमच्या डोळ्यात पाणी काढलं.


शेतकरी रात्रदिवस मेहनत करतो, कष्ट करतो. ज्या शेतीमधून शेतकरी पीक घेतो, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आमचा शेतकरी कष्ट करतो. मात्र, काँग्रेस आणि भाजपाने लुटणारी व्यवस्था निर्माण केली. त्या भाजपा आणि काँग्रेसला उखडून फेकण्याचे दिवस आले आहेत”, असे आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याचवेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांना जिल्ह्यासह देगलूर तालुक्यातील व परीसरातील रस्त्याचा विकास करता आला नाही आणि आपल्या भागातील जनतेने मत देऊन निवडून दिलेले आमदार आपले मत विधान परिषदेत विकून मतदार संघातील जनतेचा अपमान करतात त्यामुळे ते काय विकास करतील असे सांगून आमची सत्ता आल्यानंतर रस्ते व मुलभूत सुविधा देण्यासह महिलांना दरमहा तीन हजार रूपये देणार तर दिव्यांगांना सहा हजार रूपये देणार आणि शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतमालाला हमी भाव देणार असे आश्वासन देवून तिसऱ्या आघाडीचे उमेदवार सुभाष साबणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बच्चु कडू यांनी केले.तद्नंतर शक्ती प्रदर्शन करीत सुभाष साबणे यांचे नामांकन अर्ज दाखल केले.


