नांदेड, गोविंद मुंडकर| आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर साहित्यवर्तुळात चर्चेला वेग आला आहे. साहित्य महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक ऑक्टोबरमध्ये गोव्यात होणार असून, याच बैठकीत आगामी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि लेखक-अनुवादकांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच डॉ. शेषराव मोरे यांच्या नावानेही या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मात्र शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझ्याशिवाय अन्य ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक निवडावा. अशी भूमिका डॉ. शेषराव मोरे यांनी मांडली.



डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. शेषराव मोरे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे तसेच साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अनुवादक अनुराधा पाटील यांच्या नावांचा प्रामुख्याने विचार होत असल्याचे वृत्त पुण्यातून प्रसारित झाले आहे. विशेषतः डॉ. लिंबाळे आणि डॉ. शेषराव मोरे यांच्या नावासाठी ‘संघाकडून’ मोठा पाठिंबा असल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.



या पार्श्वभूमीवर डॉ. शेषराव मोरे यांची भूमिका मात्र या संपूर्ण चर्चेपेक्षा अधिक व्यापक, संयत आणि साहित्यहिताला केंद्रस्थानी ठेवणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृत्ताची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने डॉ. शेषराव मोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची सुरू असलेली चर्चा आणि त्यामागील संभाव्य प्रयत्न याबाबत विचारणा केली असता, डॉ. मोरे यांनी अत्यंत नम्रपणे आणि कोणत्याही वैयक्तिक अपेक्षेचा लवलेश न ठेवता आपली भूमिका स्पष्ट केली.



“माझ्याशिवाय अन्य ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा साहित्यिकांतून हे पद निवडले जावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. डॉ. मोरे यांच्या या भूमिकेचे महत्त्व केवळ एका व्यक्तीने अध्यक्षपदाच्या शर्यतीपासून स्वतःला दूर ठेवण्यापुरते मर्यादित नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे व्यक्तिगत प्रतिष्ठेचे पद म्हणून न पाहता, मराठी साहित्याच्या प्रदीर्घ परंपरेचा, समृद्ध विचारविश्वाचा आणि विविध साहित्यप्रवाहांचा सन्मान करणारी जबाबदारी म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी ही या भूमिकेतून सुस्पष्ट जाणवली.
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यविश्वासाठी केवळ आणखी एक साहित्यिक सोहळा नसून, एका प्रदीर्घ परंपरेचा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. अशा ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान व्हावे, याबाबत व्यक्तीपेक्षा साहित्याची व्यापक परंपरा, ज्येष्ठता, साहित्यिक योगदान, वैचारिक उंची आणि मराठी समाजजीवनाशी असलेली नाळ यांना प्राधान्य मिळावे, अशीच डॉ. मोरे यांच्या भूमिकेची अंतर्धारा दिसून आली.
डॉ. शेषराव मोरे हे गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि साहित्यिक क्षेत्रात स्वतंत्र आणि चिकित्सक विचारांसाठी ओळखले जातात. इतिहास, समाज, धर्म, संस्कृती आणि समकालीन प्रश्नांकडे चिकित्सक नजरेने पाहणारा त्यांचा लेखनविचार हा त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा होणे हे त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक योगदानाची दखल घेणारे मानले जात आहे.
मात्र, या चर्चेच्या केंद्रस्थानी स्वतःचे नाव आले असतानाही डॉ. मोरे यांनी त्याकडे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने न पाहता, “माझ्यापेक्षा अन्य ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकातून निवड व्हावी,” अशी भूमिका घेतली आहे. ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विनम्रता, साहित्याविषयीची निष्ठा आणि पदापेक्षा साहित्यपरंपरेला दिलेले महत्त्व स्पष्ट करणारी आहे.
शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदाला ऐतिहासिक महत्त्व – शंभरावे साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद ही संमेलनाची आयोजक संस्था असून, समर्थ युवा फाउंडेशन सहआयोजक आहे. त्यामुळे या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होते, याकडे संपूर्ण साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू असताना डॉ. शेषराव मोरे यांनी व्यक्त केलेली भूमिका या निवडप्रक्रियेला एक वेगळे नैतिक आणि वैचारिक परिमाण देणारी ठरते. पदासाठी आग्रह धरण्याऐवजी त्या पदाला साजेश्या व्यक्तिमत्त्वाची निवड व्हावी, हा त्यांचा दृष्टिकोन साहित्यिक संस्कृतीतील मोठेपणाचे उदाहरण ठरतो.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे केवळ व्यासपीठावरील मानाचे स्थान नसते; ते मराठी साहित्यविश्वाचे प्रतिनिधित्व करणारी वैचारिक जबाबदारी असते. त्यामुळे या पदावर कोणाची निवड व्हावी, याबाबत डॉ. मोरे यांनी व्यक्त केलेली व्यापक भूमिका साहित्यप्रेमी आणि साहित्यवर्तुळासाठी निश्चितच विचार करण्यासारखी आहे.
अध्यक्षपदाची चर्चा सुरू असताना स्वतःचे नाव पुढे यावे, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी “माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकाची निवड व्हावी” असे सांगणे—हीच कदाचित डॉ. शेषराव मोरे यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते.
शंभराव्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार, याचा अंतिम निर्णय साहित्य महामंडळाच्या बैठकीत होईल. मात्र त्यापूर्वीच डॉ. शेषराव मोरे यांनी मांडलेली ही भूमिका चर्चेतील सर्व नावांपेक्षा वेगळी आणि साहित्याच्या व्यापक हिताचा विचार करणारी ठरली आहे.

