हिमायतनगर, अनिल मादसवार| नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी पत्त्यांचे डाव रंगविण्याच्या तयारीत असलेल्या जुगार्यांना हिमायतनगर पोलिसांनी आता थेट इशारा दिला आहे. “जुगार खेळाल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी दिला असून, जुगार आणि अवैध पत्त्यांचे डाव रोखण्यासाठी पोलिसांनी तालुक्यात बंदोबस्त वाढविला आहे.



एकीकडे जुगाराविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असतानाच दुसरीकडे दारूच्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हिमायतनगर पोलिसांनी व्यसनमुक्ती अभियानाला वेग दिला आहे. गाव, वाडी आणि तांड्यांपर्यंत पोहोचून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.



दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी गावागावात जनजागृती
पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, समाजसेवक आणि पत्रकारांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये व्यसनमुक्तीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. दारूचे व्यसन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे, असा संदेश या अभियानातून दिला जात आहे.



दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘सल्फर २००’ (Sulphur 200) औषध मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. औषध स्वतःहून न घेता डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“कष्टाची कमाई जुगारात उधळू नका!”
नागपंचमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पत्त्यांचे डाव आणि जुगार सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कष्टाने कमावलेला पैसा जुगाराच्या नादात उधळू नका, असे आवाहन करत विशेषतः युवकांनी जुगारापासून चार हात दूर राहावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अवैध पत्त्यांचे डाव, जुगार किंवा तत्सम प्रकार आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. “व्यसनमुक्त गाव, तंटामुक्त गाव, जुगारमुक्त गाव!” हिमायतनगर तालुक्यात “आपले गाव—व्यसनमुक्त गाव, आपले गाव—तंटामुक्त गाव, आपले गाव—जुगारमुक्त गाव” हा संदेश पोहोचविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
“व्यसनाला नकार—कुटुंबाला आधार; जुगाराला नकार—उज्ज्वल भविष्याचा स्वीकार!”
या भूमिकेतून नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात व्यसन व जुगाराला थारा देऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी केले आहे. नागपंचमीच्या उत्सवाला भक्तीची जोड द्या; जुगाराच्या नादाला नाही! असा स्पष्ट संदेश हिमायतनगर पोलिसांनी तालुक्यातील नागरिकांना दिला आहे.

