नांदेड, प्रतिनिधी | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विभागीय कार्यालय संकुलातील (DOC) मिनी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) प्रदीप कामले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सी.एच. कल्याण राजू, वरिष्ठ रेल्वे अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह केंद्रीय विद्यालय, नांदेडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात DRM प्रदीप कामले यांनी नांदेड विभागाच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा घेतला. प्रवासी व मालवाहतूक सेवा सुधारणा, गाड्यांच्या वेळेचे काटेकोर पालन, रेल्वे सुरक्षितता, पायाभूत सुविधा व ट्रॅक देखभाल, विद्युत कर्षण आणि सिग्नलिंग प्रणालीचे बळकटीकरण तसेच प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



RPF मार्फत प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत असून, कर्मचारी कल्याण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनाही विभागाकडून प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नांदेड विभागाच्या प्रगतीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समर्पणासोबतच मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या सहकार्याचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे कामले यांनी सांगितले. नवीन आव्हानांना सामोरे जाताना सर्वांनी एकजूट, समर्पण आणि भविष्याभिमुख दृष्टिकोन कायम ठेवून नांदेड विभागासह भारतीय रेल्वेला अधिक उंचीवर नेण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.



RPF जवानांचे शिस्तबद्ध संचलन – कार्यक्रमादरम्यान RPF जवानांनी प्रभावी आणि शिस्तबद्ध संचलन सादर केले. DRM प्रदीप कामले यांनी संचलनाची पाहणी केली. प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी RPF जवानांची निष्ठा, शिस्त आणि समर्पण यावेळी अधोरेखित झाले. शांतता, स्वातंत्र्य आणि सलोख्याचे प्रतीक म्हणून DRM प्रदीप कामले यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पांढरे कबूतर आणि फुगे आकाशात सोडले. या उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात विशेष रंग भरला.
केंद्रीय विद्यालय, नांदेडच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. समूह नृत्यांसह विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. श्रीमती प्रियंका श्रीवास्तव यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. स्काऊट पथकाच्या लोकनृत्यानेही कार्यक्रमाची शोभा वाढवली.
गुणवंतांचा पारितोषिक वितरणाने गौरव – विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांसह सहभागींचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. DRM प्रदीप कामले आणि दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना, नांदेडच्या अध्यक्षा श्रीमती प्रंधन्या कामले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

दरम्यान, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सी.एच. कल्याण राजू यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा स्वातंत्र्य दिन संदेश उपस्थितांना वाचून दाखविला. एकूणच, राष्ट्रभक्ती, शिस्त आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात नांदेड विभागाचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

