हिमायतनगर, प्रतिनिधी | तालुक्यातील टाकराळा बु. येथील ४० वर्षीय अल्पभूधारक शेतकरी विलास धोंडिबा शिराणे यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार, दि. १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.



मिळालेल्या माहितीनुसार, विलास शिराणे यांनी राहत्या घरी कपाशीवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयाकडे नेले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.



विलास शिराणे यांच्या नावे टाकराळा बु. शिवारात शेती असून ते अल्पभूधारक शेतकरी होते. सततची नापिकी, शेतीतील आर्थिक अडचणी आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे ते मागील काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. तसेच खासगी कर्जाचा ताण असून शासनाच्या कर्जमाफीची अपेक्षित रक्कमही त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.



या आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर भोकर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सोमवार, दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास टाकराळा बु. येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विलास शिराणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक विवंचना, नापिकी आणि कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना वेळेत आर्थिक व प्रशासकीय मदत मिळणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

