हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग एकत्र जुळून आल्याने भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. उभ्या असलेल्या हरिहर अवतारातील श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच महिला-पुरुष भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.



श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हा योग अनेक वर्षांनंतर जुळून आल्याने या दिवशी श्री परमेश्वर तथा महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली. सोमवारी सकाळी ६ वाजता पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून श्री परमेश्वराचा विधिवत अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.




श्रावण मासानिमित्त यंदा श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १४ ऑगस्टपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेला सुरुवात झाली असून, ह.भ.प. सुश्री स्नेहगंगाश्रीजी माई आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे रसाळ वर्णन केले जात आहे. कथा श्रवणासाठीही दररोज हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष भाविक उपस्थित राहत आहेत.




श्रावण मासात श्री परमेश्वर महादेवाला बिल्वपत्र, धोत्र्याचं फूल व फळ अर्पण करून मनोकामना केल्यास ती पूर्णत्वास जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी सांगितले. यावेळी मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंता देवकते, सर्व संचालक, मान्यवर तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी दानशूर भाविकाच्या सहकार्यातून मंदिराकडून महाप्रसाद वितरण करण्यात आला.

शेषनाग मूर्तीच्या दर्शनासाठीही महिलांची गर्दी – दरम्यान, नागपंचमीच्या निमित्ताने शहरालगत असलेल्या जाधव कुटुंबियांच्या शेतात असलेल्या भव्य शेषनाग मूर्तीच्या दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातही नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. महिला व मुलींनी पारंपरिक झोक्यांचा आनंद घेत सण साजरा केला. विविध ठिकाणी महिलांनी वारुळाची पूजा करून नागदेवतेला नमन केले. श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या दुहेरी पर्वामुळे हिमायतनगर तालुक्यात दिवसभर भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

