प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चतुर्थीच्या दिवशी पोलीस ठाण्यात श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या एक दिवस आधी पोलीस ठाण्यातील गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.


विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच टाळ-मृदंगाचा नाद, हरिनामाचा गजर आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. पारंपरिक वेशभूषेत सादर करण्यात आलेले भारुड, भजन आणि गौळणी यामुळे मिरवणुकीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक रंग चढला. त्याचवेळी फुगडीचा खेळही रंगला आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह उपस्थितांनी या आनंदसोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.


विशेष म्हणजे, धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला. “व्यसनापासून दूर राहा, कुटुंब आणि समाजाचे भविष्य वाचवा” असा संदेश भारुड-भजनातून देत पोलिसांनी गणेशोत्सवाला प्रबोधनाची दिशा दिली.



पोलीस ठाण्यापासून शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीदरम्यान गणरायावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. भक्तांच्या जयघोषात आणि भावपूर्ण वातावरणात श्री गणरायाला निरोप देण्यात आला.
त्यानंतर हिमायतनगर येथील कनकेश्वर तलावातील विहिरीत श्री गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. बाप्पाच्या विसर्जनावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत भक्तिभाव दाटून आला. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या सोहळ्यास पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जमादार, पोलीस कॉन्स्टेबल तसेच पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे गणेश विसर्जन हिमायतनगरच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरले.

