नांदेड| पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम सन 2020 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. यावर्षी माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.


या अभियानात निसर्गातील पंचमहाभूतांवर भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश यावर आधारित पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात येते. शासनाने निर्धारित केलेल्या टूलकिटमधील निर्देशांनुसार, ग्रामपंचायतींनी एप्रिल ते मार्च या कालावधीत विविध उपक्रम राबवायचे असून त्याची नोंद शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. त्यानंतर डेस्कटॉप व क्षेत्रीय मूल्यांकनाच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची यात निवड केली जाते.


मागील वर्षीही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माझी वसुंधरा 3.0 मध्ये हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतीने राज्यात व्दितीय क्रमांक, तर माझी वसुंधरा 4.0 मध्ये कंधार तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायतीने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. माझी वसुंधरा 5.0 मध्ये जिल्ह्यातील सर्व 1,310 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून पोर्टलवर माहिती अपलोड केली असून सद्यःस्थितीत मूल्यांकनाची प्रक्रिया अभियान संचालनालयामार्फत सुरू आहे.


अभियानात राज्यस्तर व विभागीय स्तरावर लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींची निवड सात गटांमध्ये केली जाते. यात 1 हजार पेक्षा कमी लोकसंख्येपासून ते 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश असतो. माझी वसुंधरा 6.0 मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी टूलकिटमधील सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी संयुक्तपणे केले आहे.



