नवीन नांदेड l विज्ञान भारतीतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच “विद्यार्थी विज्ञान मथन”. या परीक्षेतील राज्यस्तरीय पातळीची परीक्षा या वर्षी नांदेड येथे येत्या ८ डिसेंबरला श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड येथे होत आहे.
ही परीक्षा विज्ञान भारतीच्या सोबत एनसीईआरटी आणि एनसीएसएम, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.
या वर्षीचे देवगिरी प्रात (मराठवाडा खान्देश) आणि विदर्भ प्रांत येथील विद्यार्थ्यां साठीचे राज्यस्तरीय शिबीर हे नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियात्रिकी व तत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड येथे संपन्न होणार आहे. परीक्षा सपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांची शास्त्रज्ञांसोबत चर्चा हे सत्र घेण्यात येते. त्या करिता आपल्या नांदेड मधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्या सोबतच विद्यार्थ्यांसमवेत येणाऱ्या पालकासाठी देखील विशेष माहितीपूर्ण अशा सत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे.
प्रामुख्याने ज्येष्ठ विज्ञान प्रसारक डॉ. रजन गर्ने, नवीन शैक्षणिक धोरणाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य डॉ.अजय महाजन,छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम च्या विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर यांचा समावेश असेल अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे आणि विज्ञान भारती देवगिरी प्रांताचे श्री अमोल कुभलकर यांनी दिली.