नांदेड l मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत मान सन्मानाचा ठरलेल्या कथाकथन या प्रकाराला उजाळा देण्यासाठी आणि कथाकथनाची परंपरा कायम ठेवण्यासाठी ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांच्या संकल्पनेतून काल रात्री उमरी तालुक्यातील करकाळा येथे वासंतीक कथायन हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रातील पहिला ठरलेल्या या आगळ्यावेगळ्या कथायन कार्यक्रमाने रसिक भारावले होते.


श्री यशवंतराव ग्रामविकास प्रतिष्ठान करकळ्याच्या वतीने काल दिनांक 26 मार्च रोजी रात्री वासंतीक कथायन हा कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती मारोतराव कवळे गुरुजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कथायनचे अध्यक्ष प्रा. शंकर विभुते यांच्यासह प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक देवदास फुलारी , विसाव्या लोकसंवाद मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. महेश मोरे , आयोजक दिगंबर कदम , सहभागी कथाकार राम तरटे अनुपमा बन ,रोहिणी पांडे , रुचिरा बेटकर यांनी कथा सादर करून श्रोत्यांना कधी हसून तर कधी रडवून सोडले .


अनुपमा बन यांनी सादर केलेल्या हुंडाबळीच्या एकपात्रीने उपस्थितांच्या डोळ्याला पाझर फुटले होते. याचवेळी महिलांच्या जीवनातील असाही वेदनांची मांडणी करणारा आणि आत्मचिंतन करायला लावणारी ‘ बोळा ‘ ही कथा सादर करून रोहिणी पांडे आणि उपस्थित खिळवून ठेवले. याचवेळी रुचिरा बेटकर यांनी ‘खोडकर संगी ‘ ही कथा सांगून ग्रामीण भागातील लाजऱ्याबुजऱ्या मुलीने आपला स्वभाव बदलून इतरांना धडा कसा शिकवला चित्र जिवंत केले.


प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी ग्रामीण भागातील हागणदारी मुक्तीवर ‘ टमरेलाच तोरण ‘ ही कथा सादर करून उपस्थितांना खळखळून हसवलं. गावाकडील हागणदारी आणि त्यानंतर हागणदारी मुक्तीसाठी शासनाकडून करण्यात आलेली कारवाई. त्यातून निर्माण झालेले अनेक विनोदी प्रसंग जसेच्या तसे चितारून त्यांनी हास्य कल्लोळ निर्माण केला होता. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.शंकर विभुते यांची ‘ आमदार गणपतराव ‘ या कथेने दादा मिळवली. कोणत्याही प्रसंगातून पालटिक्स आहे असे सांगून गणपतराव म्हणजे गणप्या कसा आमदार झाला हे आपल्या कथेतून सादर करत त्यांनी हास्याचे फवारे उडविले.

यावेळी देविदास फुलारी आणि मारोतराव कवळे गुरुजी यांची समायोचीत मनोगत झाली. जेव्हा कथाकथनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा कवळे गुरुजींचे नाव कथाकथन जिवंत ठेवणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .यावेळी रघुनाथ पाटील कदम , आनंद कदम , मल्लू कमळे , साहेबराव कदम , संतोष कदम , उत्तम कदम , व्यंकटी पाटील , दिलीप सावंत आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले तर आभार दिगंबर कदम यांनी मानले.


