माहूर, इलियास बावानी| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत श्रीक्षेत्र माहूर येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले.


या प्रसंगी नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी, रुग्णकल्याण समितीचे अनिल वाघमारे, नगरसेवक गोपू महामुने, भाजप तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार केराम म्हणाले, “ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती हळूहळू सुधारत असून गेल्या पाच वर्षांत अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर यांसारख्या महत्वाच्या सुविधा उभारल्या जातील. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी गोरगरीब रुग्णांच्या सेवेत कमी पडू नये,” असे आवाहन त्यांनी केले.


शिबिरात आलेल्या हजारो रुग्णांना तपासणी व निदान सेवा देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ. राजाभाऊ गुट्टे, डॉ. राजेश माचेवार, डॉ. ओमप्रकाश साबळे, डॉ. अक्षय सांगळे, डॉ. कैलास चव्हाण, डॉ. बिपीन बाबळे, डॉ. अंजली पाटील, डॉ. साईनाथ, डॉ. जाधव आदींसह तब्बल दीडशेहून अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात होते.



शिबिरात अनेक महिलांचा सत्कार करून त्यांना रोपटी देण्यात आली. अंगणवाडी सेविका, परिचारिका व अन्य मान्यवर महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील विविध नव्या कक्षांचे उद्घाटन देखील आमदार केराम यांच्या हस्ते झाले.
याशिवाय, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार केराम यांच्या हस्ते करण्यात आले.


