नांदेड l नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने नाराज असलेल्या माधव पावडे सह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे आक्रमक शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र निष्ठावान शिवसैनिकांना डावलून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये उपऱ्यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या माधव पावडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला .
आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादीचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते माधव पावडेसह शिवसेनेचे जिल्हा संघटक नेताजीराव भोसले , महानगर प्रमुख पप्पू जाधव , तालुका प्रमुख गणेश शिंदे , युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे , युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे , युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे , दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी , युवा सेना शहर प्रमुख अभिजीत भालके, सभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.
विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने माधव पावडे होते नाराज शिवसेनेत गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेने काम करूनही या पक्षात उपऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देत असल्याची ओरड होत असताना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने माधव पावडे यांना जाणीवपूर्वक उमेदवारी नाकारली तर अन्य पक्षातून आलेल्या उपऱ्यांना संधी देऊन निष्ठावानांची गोची केली. त्यामुळे नाराज झालेल्या माधव पावडे यांनी अखेर आ. चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.