हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गावात परिसरात गुरुवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये दोन शालेय मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने हदगाव तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव तालुक्यातील मौजे गारगव्हाण येथे चार मुले सकाळी दहा वाजताच्या सुमारास गावाजवळ फिरण्यासाठी व खेळण्यासाठी गेली होती. तेव्हा त्यापैकी एक मुलगा खोल खड्ड्यात पाय घसरून पडला. हा खड्डा कथितपणे बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे तयार झाला होता. आणि अलीकडील जोरदार पावसामुळे तो पाण्याने भरून गेला होता.

आपला मित्र बुडत असल्याचे पाहून दुसरा मुलाने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सदर मुलांची ओळख पटली असून, संघर्ष बाळू पडघणे (वय १६ वर्षे), रा. नेवरी आणि निखिल कुंडलिक वाढवे ( वय १५ वर्षे) असे नावं आहेत. संघर्षने नुकतीच १० वी परीक्षेत ७८% गुणांसह उत्तीर्ण झाली होता. उन्हाळ्याच्या तो सुट्टीसाठी मामाच्या घरी गारगव्हाण येथे आला होता.

तर दुसरा मुलगा निखिल आठवीत शिक्षण घेत होता. घटनेच्या वेळी त्यांच्या सोबत आणखी दोन मुले होती. त्यांनी ही दुर्घटना पाहून तात्काळ गावात जाऊन लोकांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांना पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, हदगाव येथे नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गट नंबर ८७ मध्ये एका खासगी कंपनीने मुरूम उत्खननामुळे झालेल्या खड्ड्यात घडला. नियमानुसार उत्खननाची खोली ३ मीटरपर्यंत मर्यादित असावी, मात्र या ठिकाणी १० ते १५ मीटर खोलपर्यंत खणण्यात आले होते. ज्यामुळे प्रचंड खड्डे तयार झाले. अलीकडील मुसळधार पावसामुळे हे खड्डे जलाशयात रूपांतरित झाले. पोलिस निरीक्षक पुणेकर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला असून, दोघा मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मनाठा पोलिस ठाण्यास देण्यात आली आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर गारगव्हाण गावात शोककळा पसरली आहे. गावकरी व मृत मुलांच्या नातेवाइकांनी दोषी ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, वेळेत बेकायदेशीर उत्खननावर कारवाई झाली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती.