नांदेड| गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे व दोन पल्सर मोटारसायकली असा एकूण ₹२,४४,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन फ्लश” अंतर्गत अवैध शस्त्रसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोहीम राबवण्यात आली. सुरज गुरव (अप्पर पो. अधीक्षक, नांदेड), श्रीमती अर्चना पाटील (अप्पर पो. अधीक्षक, भोकर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय,पो. उपनि.मिलिंद सोनकांबळे यांनी ही धाडसी कारवाई केली.



गोपनीय माहितीनुसार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी लोहा येथील शनिमंदिराजवळ आरोपी पिस्तुल विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी सापळा रचून दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. अंगझडतीतून गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे व मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.


आनंद उर्फ चिन्नु सरदार यादव (वय २४, रा. वजीराबाद चौक, नांदेड),जावेद उर्फ लडया रहेमत शेख (वय २१, रा. जामा मस्जिद जवळ, विष्णुपुरी, नांदेड) या दोन्ही आरोपींविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल (किंमत ₹६४,०००/-) १४ जिवंत काडतुसे, दोन पल्सर मोटारसायकली (किंमत ₹१,८०,०००/-) एकूण किंमत: ₹२,४४,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.



