नांदेड। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील नोंदणी अधिकारी यांच्या मनमानीमुळे नोंदीत आणि जीवित कामगार आपल्या न्याय हक्क आणि अधिकारापासून वंचीत असल्यामुळे १२ जून रोजी दुपारी १२ वाजता हजारोच्या संख्येने मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व मोर्चास सुरवात झाली.


मोर्चाचे नेतृत्व सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेचे सचिव अब्दुल वसीम अब्दुल सलीम यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिकेत थोरात यांनी संघटना प्रतिनिधी यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा केली परंतु समाधान झाले नसल्याने मोर्चा काढण्यात आला.

इमारत बांधकाम कामगार व घरेलू तसेच असंघटित कामगारांना कल्याणकारी मंडळा मार्फत अनेक प्रकारचे लाभ देण्यात येतात. त्यामध्ये नोंदीत कामगारांना ६० वर्षानंतर ३ हजार पेन्शन, मृत्यू विमा दोन लाख रुपये. अपंगत्वासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत, स्वास्थ्य विमा, कौशल्य विकास प्रशिक्षण, आवास व शिक्षणासाठी मदत, लग्नासाठी कन्या विवाह योजनेसाठी ५५ हजार ते ६५ हजार रुपये मदत, मोफत शिलाई मशीन, विमा सुविधा या व्यतिरिक्त इतरही लाभ हक्काने मिळतात.परंतु कामगारांप्रति अत्यंत उदासीन असलेल्या नोंदणी अधिकारी श्रीमती पठाण मॅडम यांनी हजारो नोंदीत आणि जीवित कामगारांना बोगस असल्याचे ग्राह्य धरून त्यांचे अर्ज नामंजूर केले आहेत.


त्यांच्या मते हजारो लेबर कार्ड हे बोगस आहेत आणि त्यांना लाभ देय नाही. दुसरीकडे मात्र काही अर्जदारांना त्यांनी पात्र ठरवून भांडे संच वाटप केले आहेत. त्यांनी स्वतः निर्जनस्थळी स्वतःची उपस्थिती लावून दहा हजार रुपये किमतीचे भांडे संच वाटप करून भेदभाव केला आहे. त्यांच्या मते इमारत व बांधकाम कामगारांची मी पडताळणी केल्यावर भांडे वाटप करणार आहे. त्या कामगारांना विचारत आहेत की तुम्ही खरे कामगार आहात काय? एका डेपो मध्ये सिमेंट किती असते, वाळू किती असते? आणि योग्य उत्तर मिळाले नाहीतर त्या कामगारांना लाभ देण्याचे रद्द करीत आहेत.

त्यांना हे माहिती नाही की इमारत व बांधकाम क्षेत्रात एकूण ५३ पेक्षा अधिक प्रकारचे कामगार पात्र असतात आणि ते त्यांचा हक्काचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या मते मिस्त्री आणि बिगारी हे दोन प्रकारचेच कामगार लाभास पात्र आहेत. परंतु असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार, मजूर, बिगारी, सुतार, मिस्त्री,गवंडी,पलंबर, पेंटर, शेतीकामगार,घरेलू कामगार, रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, पथविक्रेते, फळ भाजीपाला विक्रेते, रिक्षा चालक, टेलर, शिंपी, मच्छिमार,चर्मकार,कचरा वेचक, दैनंदिन मजुर, हातमाग व हस्तकला कामगार, न्हावी, वाहन चालक, टॅक्सी ड्राइवर, विटभट्टी कामगार, धोबी, सुरक्षा रक्षक, हॉटेल कामगार असे ५३ पेक्षा अधिक कामगार हे लाभास पात्र आहेत.
कामगारांची नोंदणी व नूतनिकरण करण्यासाठी जबाबदार यंत्रणा व पारदर्शक प्रक्रिया असताना हजारो कामगारांना रिजेक्ट केल्यामुळे सरकारप्रति रोष निर्माण झाला आहे. नोंदीत कामगारांना सरसगट भांडे संच आणि सर्व योजणांचे लाभ देण्यात यावेत. वेळेत नूतनिकरण करून घ्यावे. दुजाभाव न करता सर्वांना लाभ देण्यात यावा. यादी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नांवाशमनपाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली.
जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड,अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड,सामाजिक कार्यकर्त्या कॉ.यास्मिन पठाण,डीवायएफआयचे कॉ. श्याम सरोदे आदींची उपस्थिती होती. त्यांनी पाठिंबापर आपले मनोगत व्यक्त केले.
येऊ घातलेल्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा बिलाची व चार श्रम संहितेचा निषेध करण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. जयराज गायकवाड, कॉ. रमेश गायकवाड, कॉ.अजिजूर रहेमान, कॉ.चंद्रकांत लोखंडे,सय्यद मुस्तफा, अब्दुल फहीम, अब्दुल परवेश, अमजद पठाण, शेख अमीर, अमीन पठाण आदींनी प्रयत्न केले.

