देगलूर/नांदेड| प्लॉटचा नाद सोडून दे म्हणत एका २८ वर्षीय तरूणास दगडाने मारहाण करून यमसदनी पाठविल्याची खळबळजनक घटना दिनांक ५ फेब्रुवारी रोजी भर दुपारी १ वाजताच्या सुमारास देगलूर तालुक्यातील तुपशेळगाव येथे घडली आहे. राजेंद्र बाबुराव वाघमारे असे मयत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली तर एकजण फरार आहे.


याबाबत मयताची पत्नी सविता राजेंद्र वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सविस्तर व्रत असे कि, राजेंद्र वाघमारे यांनी गावातील शिवाजी निवृत्ती बोईवार यांचा रिकामा प्लॉट खरेदी केला होता. मात्र सदर प्लॉट हा दुसऱ्याच्या नावे असल्याचे त्यांना सांगण्यात आले नाही. दरम्यान खरेदी केलेल्या प्लॉटची रक्कम देखील त्यांनी दिली होती. त्यानंतर संबंधितांनाही राजेंद्र वाघमारे यांना ज्यांच्या नावे प्लॉट आहे ते प्लॉटचा नाद सोडून दे अन्यथा मारून टाकू अशी धमकी देत होते.

यासाठी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी राजेंद्र वाघमारे मळणीयंत्र घेवून जात असताना महेश बालाजी बोईवार व शिवाजी निवृत्ती बोईवार यांनी त्यांना रस्त्यात अडवून दगडाने मारहाण केली. आवाज ऐकल्यावर सविता वाघमारे व त्यांचे सासरे तेथे गेले असता कोणतीच हालचाल करत नसल्याने राजेंद्र यांना देगलूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
