कंधार (सचिन मोरे) शुक्रवारी सायंकाळी सातच्या आसपास कंधार तालुक्यामध्ये अक्षरशः आभाळ फाटल्यागत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील जगतुंग समुद्राने धोक्याची पातळी गाठली असून पावसामुळे पन्नासच्या आसपास गवांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने चार गावे वेढल्या गेली आहेत. तर शेकडो जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन दिवसापासून तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून शेतीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रचंड पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


२७ व २८ ऑगस्ट रोजी पावसाने रौद्ररूप धारण करून तालुक्यातील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली होती. पुरामुळे शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली होती. मोठ्याप्रमाणात घरे पडली होती. भिंत कोसळून चार ते पाच जणांना जीव गमवावा लागला होता. ती परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शुक्रवारी रात्री पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. रात्रभर व शनिवारी सायंकाळ पर्यंत तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाने बघता बघता रौद्ररूप धारण केली.


अतिवृष्टीमुळे येलुर, मसलगा, वरवंट, राहटी, चौकी धर्मापुरी, शिर्सी खुर्द, शिर्सी बुद्रुक, बाचोटी, घोडज, मानसपुरी, बोरी, वाखरड, कौठा, तेलूर, जंगमवाडी, शिरूर, फुलवळ, कंधारेवाडी, पानशेवाडी, संगमवाडी, जांभूळवाडी, आनंदवाडी, गंगनबीड,बाबुळगाव या नदीकाठच्या गावातील अनेक घरात पाणी शिरल्याची माहिती आहे. तर अनेक जुनी घरांची पडझड झाली. जाकापुर, नारनाळी, तेलूर आणि बोरी खुर्द, ही चार गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत.


तालुक्यातील अनेक लहान मोठ्या पुलावरून पाणी गेल्यामुळे पन्नास गावचा संपर्क तुटला आहे. बहादरपुरा पुलावर पाणी आल्यामुळे कंधार- मुखेड, कंधार-बिदर हे दोन राज्य महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत. तसेच मानसपुरीच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे कंधार- नरसी हा मार्ग बंद आहे. तर तालुक्यातील अनेक गावांमध्ये लहान मोठी पुले व रस्ते खरडून गेल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पुराच्या पाण्यामुळे मन्याड नदी काठावरील २५ ते ३० गावातील दोन्ही बाजूची शेती व शेतीतील उभे पिके वाहून गेली यामुळे शेतीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसाच्या थैमानामुळे तालुक्यातील अनेक तलाव तुडुंब भरले
तालुक्यात पावसाने थैमान घातल्यामुळे तालुक्यातील प्राचीन असलेला जगतुंग सागर हा तलाव शंभर टक्के भरला तर पानशेवडी, बोळका,श्रीगणवाडी, महालिंगी,पांगरा, घागरदरा,मोहिजा, वहाद, गोगदरी यासह तालुक्यातील अनेक लहान-मोठी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
नागरिकांनी दक्ष रहावे घरातून कोणीही बाहेर पडू नये- आ. चिखलीकर
कंधार तालुक्यात पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे तालुक्यातील शेतीचे उभे पिके पाण्याखाली गेल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. बाधित क्षेत्राच्या बाबतीत मी कंधार तालुक्यात सर्वत्र लक्ष ठेवून असून प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संकटाला न डगमगता त्याचा मुकाबला करावा आत्महत्या सारखे चुकीचे पाऊल उचलूू नये या भागाचा आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेस मदत करण्यासाठी प्रशासन व आम्ही सक्षम आहोत, काळजी घ्या असे भावनिक आवाहन कंधारचे आमदार चिखलीकर यांनी केले आहे.
“प्रशासन जनतेच्य पाठीशी- उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे
कालपासून सतंतधार पावसामुळे बारूळ व लिंबोटी धरण व जगतुंग तलाव तसेच तालुक्यातील अनेक छोटे मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. लिंबोटी धरण पूर्ण भरल्याने धरणाची दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून जलद गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बहाद्दरपुरा येथील पुलावरून पाणी जात आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. आपल्या जीवाची काळजी घ्यावी,कामा शिवाय घराबाहेर पडू नये प्रशासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले.

