नांदेड| आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवाव्यात. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारची अधिक शक्तीने निवडणूक लढवून जिल्हा परिषद व पंचायत समितीत अधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे मत नांदेड जिल्ह्यातून आलेल्या विविध कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केले.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नांदेडच्यावतीने दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातून आलेल्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृह राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आ. प्रदीप नाईक यांच्या सुविद्य पत्नी बेबीताई नाईक, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, प्रदेश प्रतिनिधी कल्पना पाटील डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, रंगनाथ वाघ, दादासाहेब शेळके, जयंत पानोळे, सुभाष गायकवाड, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, प्रकाश राठोड आदी जणांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री सुर्यकांता पाटील म्हणाल्या की, आपुलकी आणि विश्वासावर संघटना टिकते. निवडणुकीमध्ये पैसा लागतोच असे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी अधिक जोमाने काम करावे, कार्यकर्त्यांशी पाठीशी आम्ही अधिक शक्तीने या निवडणुकीत काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांनी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केलेले विकासाचे भरीव काम यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपला पक्ष नंबर एकचा होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले. तर शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम सन्मानपुर्वक जागा देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी राष्ट्रवादीचे पक्षसंघटन लक्षात घेता अनेक ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक आहे, त्यामुळे सन्मानपुर्वक जागा मिळाल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने लढू, प्रत्येकाला न्याय देऊ असे त्यांनी सांगितले.


तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष रावणगावकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन शंकर इंगळे यांनी मानले. या आयोजित केलेल्या महत्वपूर्ण बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे, उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी विस्तृतपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.




