नांदेड, अनिल मादसवार| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुद्रीत व अन्य सर्व माध्यमामध्ये सर्व उमेदवारांना प्रसिध्दीचा समतोल न्याय मिळावा, अशी अपेक्षा काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी आज झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केली. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यमांना सर्व उमेदवारांना समतोल न्याय देण्याचे आवाहन केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला सामान्य, खर्च आणि पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती. यात श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे), शेलेंद्रकुमार (भाप्रसे), श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे), रण विजय यादव (भाप्रसे), कालु राम रावत (भापोसे), मृणालकुमार दास (आयआरएस), मयंक पांडे (आयआरएस), ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार याशिवाय या निवडणुकीमध्ये जबाबदारी सोपविण्यात आलेले प्रत्येक विभागाचे नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकसभा पोटनिवडणूकीत सहभागी असणाऱ्या विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.
या प्रतिनिधीनी यावेळी वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांमध्ये काही पक्षाच्या उमेदवाराना अधिक महत्व दिले तर जात नाही ना ! कोणत्याही बातम्या पेडन्युज म्हणून येत नाही ना याबाबतची शंका उपस्थित केली. या संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कार्यरत असून या समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांची तपासणी केली जाते. तसेच सर्व वाहिन्या व समाज माध्यमांवर या समितीचे लक्ष असून कोणावरही अन्याय होणार नाही तसेच प्रत्येक गोष्टीचा हिशेब खर्च विभागाला दिला जाईल असे स्पष्ट केले. तसेच पेडन्युज संदर्भात अशा पध्दतीचे काही लक्षात आल्यास एमसीएमसी समितीला कळविण्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रकाशित होणारे सर्व वृत्तपत्र या काळात एमसीएमसी कक्षाला उपलब्ध केले जातात. तसेच सर्व प्रिंटर, प्रकाशक, संपादक यांनी देखील आपले वृत्तपत्र सनियंत्रित होईल याची दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक काळात आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही. प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने निवडणूक काळामध्ये करावयाच्या वृत्तांकनाचे चौकटीचे पालन करावे, असेही यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये एकूण मतदार
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 9 लाख 78 हजार 234 पुरूष तर 9 लाख 30 हजार 158 महिला व 154 तृतीयपंथीय मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ज्या सहा विधानसभा क्षेत्रात ही निवडणूक होणार आहे त्याची मतदार संख्याही त्यांनी यावेळी सांगितली. लोकसभेमध्ये भोकर विधानसभा क्षेत्रात 3 लाख 3 हजार 103, नांदेड उत्तर 3 लाख 58 हजार 918, नांदेड दक्षिणमध्ये 3 लाख 16 हजार 821, नायगावमध्ये 3 लाख 10 हजार 375, देगलूरमध्ये 3 लाख 12 हजार 237, मुखेडमध्ये 3 लाख 7 हजार 92 एवढे मतदार आहेत. त्यामुळे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदान करणार आहेत.
तर विधानसभेसाठी आणखी तीन तालुके यामध्ये वाढले असून किनवटमध्ये 2 लाख 78 हजार 65, हदगावमध्ये 2 लाख 99 हजार 86, लोहामध्ये 3 लाख 1 हजार 650 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 9 विधानसभा क्षेत्रामध्ये 27 लाख 87 हजार 947 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत याबाबत त्यांनी माहिती दिली. याशिवाय मतदान यंत्र व उपलब्ध मनुष्यबळाची माहीती देण्यात आली.
निर्भय होवून निवडणूक लढा
यावेळी वेगवेगळ्या ठिकाणावरुन आलेल्या निवडणूक निरिक्षकांनी प्रतिनिधीशी संवाद साधला. उमेदवारांना कोणतीही अडचण असेल, कोणताही दबाव येत असेल तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रतिनिधीना यावेळी निवडणूक निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक पुन्हा देण्यात आले. यामध्ये सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (किनवट व हदगाव- ७४९९१२७२६५), नांदेड उत्तर मतदार संघासाठी श्रीमती बी. बाला मायादेवी (संपर्क क्रमांक ८४८३९९०३८०), नांदेड दक्षिण व लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (संपर्क क्रमांक ८२३७९६०९५५), नायगांव व देगलूर व मुखेड मतदार संघासाठी रण विजय यादव (संपर्क क्रमांक ७३८५८४२०८४), भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालुराम रावत (संपर्क क्रमांक ८१८०८३०६९९) किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण मतदार संघासाठी खर्च निरीक्षक मयंक पांडे (संपर्क क्रमांक ८४८३८४५२२० ), लोहा, नायगाव, देगलूर, मुखेड साठीचे खर्च निरीक्षक ए.गोविंदराज (संपर्क क्रमांक ७२४९०४८०४०) लोकसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक मृणालकुमार दास यांचा संपर्क क्रमांक ८६२६०९५९२२ असा आहे.