नांदेड। एखादा संगीत महोत्सव, एखाद्या शहराची ओळख व्हावी व त्या ओळखीने एक तपपूर्ती करावी, असा दुग्धशर्करा योग यंदा नांदेडच्या संगीत प्रेमींना दिवाळी पहाटमुळे लाभणार आहे. गीत,गझल, ख्याल व बंदीशी, ठुमरी, दादरा, सुगम संगीत आणि लोकसंगीत यांनी दिवाळीच्या शुभेच्छांची सूरमयी पहाट अर्थात दिवाळी पहाट दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत, बंदाघाट येथे गोदावरीच्या रम्य काठावर संपन्न होणार आहे.


नांदेड जिल्ह्याच्या सांस्कृतिक महोत्सवांच्या परंपरेतील, रसिकांनी डोक्यावर घेतलेला उत्सव म्हणजे दिवाळी पहाट! गेली ११ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला दिवाळी पहाट हा कार्यक्रम यावर्षी १२ वे वर्ष तपपुर्तीने साजरे करीत आहे, हे या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. शास्त्रीय संगीतासह, नाट्यगीत, सुगम संगीत, सिने संगीतांची मेजवानी नांदेडकरांना देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, गुरुव्दारा सचखंड बोर्ड, नांदेड शहर मनपा, नांदेड व नागरी सांस्कृतिक समिती यांच्या वतीने साजरा होत आहे.

यापूर्वी या कार्यक्रमात गायक पं.राहुल देशपांडे, पं.निनाद आजगांवकर, पं.राजा काळे, श्वेता देशपांडे, धनश्री देव-देशपांडे, पं.नंदेश उमप, शास्त्रीय नृत्यंगणा भार्गवी विकास देशमुख,पं.ब्रजेश्वर मुखर्जी, पं.ईश्वर घोरपडे, मेघा गायकवाड, डॉ. कल्याणी जोशी, धनंजय जोशी, सौ.आसावरी जोशी बोधनकर या नामांकित कलाकारांनी हजेरी लावली आहे.

यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण भीमराव पांचाळे यांच्या गजल गायनाच्या कार्यक्रमांसह रागी किर्तनाची परंपरा जगभर प्रसार करणारे पटीयाला घरण्याचे गायक सतनिंन्दर सिंघ बोडल यांच्यासह अनुजा वर्तक व संच असणार आहे. पंडित रशीदखां यांचे पट्टशिष्य नागेश आडगांवकर यांच्या सुरेल मैफलीचा आस्वाद घेता येणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिवाळी पहाट आयोजनाच्या वेळोवेळी बैठका घेऊन, निर्देश दिले आहेत. त्यास प्रतिसाद देत नियोजन समितीने पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यावर्षीच्या दिवाळी पहाटचा प्रारंभ दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ५ वाजता सचखंड गुरुव्दारा नांदेड येथील रागी यांच्या शबद किर्तनाने होईल. त्यानंतर पहाटे ५.३० वाजता मुंबई येथील टीव्हीस्टार व सुप्रसिध्द गायिका अनुजा वर्तक तसेच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाची गायिका सई जोशी व मुंबई आयडाल मितांशू सावंत यांचा कार्यक्रम सादर होणार असून त्याचे निवेदन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.नंदकुमार मुलमुले हे करणार आहेत. दि.३१ ऑक्टोबर २०२४ च्या सायंकाळी सांज दिवाळीमध्ये पटीयाला येथील शाम चौरसीया घराण्याचे ख्यातीप्राप्त गायक सतनिंन्दर सिंघ बोडल यांच्या गुरुगोबिंद दा दरबार या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन गझलकार बापू दासरी हे करणार आहेत.
दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी शुक्रवारी पहाटे परंपरेप्रमाणे स्वंयवर प्रतिष्ठान नांदेड प्रस्तुत शास्त्रीय संगीतावर आधारीत स्वर सरीता या मैफिलीने होणार आहे. यात पंडित रशीदखां यांचे पट्टशिष्य नागेश आडगांवकर यांचे गायन होईल. या मैफिलीचे निवेदन कवी देवीदास फुलारी हे करणार आहेत. यादिवशी लक्ष्मीपूजन असल्या कारणाने यावर्षी देखील सायंकाळी कोणतेही सादरीकरण होणार नाही.
दि.२ नोव्हेंबर २०२४ शनिवारी रोजी दिवाळी पाडवा पहाट या कार्यक्रमात नांदेड येथील स्थानिक कलावंताचा नियोजीत कार्यक्रम ‘ह्रदयसंगम’चे आयोजन पत्रकार विजय जोशी यांच्या प्रस्तुतीने होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांची असून, संगीत दिग्दर्शन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे आहे. गायिका शर्वरी डोंगरे, विजय जोशी, चैती दिक्षित, अपूर्वा कुलकर्णी, शुभम कांबळे, नामदेव इंगळे, समिक्षा चंद्रमोरे यांचे सादरीकरण असणार आहे. या कार्यक्रमाची थीम प्रसिध्द संगीतकार व गायक पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या रचनांवर आधारीत आहे. व्यवस्थापन सहाय्य पत्रकार विजय बंडेवार यांचे आहे. दि.२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या सुश्राव्य गझलमैफिलीने होणार आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे करणार आहेत.
आचारसंहितेच्या काळात होणार्या या कार्यक्रमामध्ये स्विप उपक्रमांतर्गत श्रोत्यांना मोठ्या संख्येने मतदान करण्याबाबत प्रत्येक कार्यक्रमांमधून आवाहन केले जाणार आहे. नागरिकांनी दिवाळी सणानिमित्त आयोजीत दिवाळी पहाट या त्रिदिवसीय महोत्सवास दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भरघोस प्रतिसाद द्यावा व आयोजित कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.