हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्र. १७ मध्ये असलेल्या फुलेनगर वस्तीत ३० वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या नागरीकांच्या घरांची नगरपंचायत तर्फे कर आकारणी करुन प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुलाचे बांधकामासाठी परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले असताना हिमायतनगर नगरपंचायतीकडून अंमलबजावणी न करता टाळाटाळ चालविली जात आहे. त्यामुळे फुलेनगर येथील नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नगरपंचायतीच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात आमरण उपोषण (The citizens of Phulenagar are on hunger strike) सुरु केलं आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्र.१७ मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सन १९८७-८८ या काळात बेघर भूमिहिन घरकुल योजनेनुसार घरे बांधुन देण्यात आली होती. सदर कच्चा मातीची घरे या काळात जिर्ण झालेली असून, तेथे ३० वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरे मंजुर झालेली आहेत. सर्व लाभार्थी घर बांधण्यास इच्छुक असून देखील काही अनावश्यक कारणामुळे फुलेनगर येथील लाभार्थ्याना नगरपंचायतीकडून घरकुल बांधकाम करण्याकरीता परवानगी मिळत नाही. तेथील नागरीकांना घर बांधणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र लाभार्थ्यांना ४३ नंबरचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण समोर करून शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे.

यासाठी नागरिकांनी अनेकदा वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा केला त्यावरून जिल्हाधिकारी महोदयांनी देखील नगरपंचायतीला पत्र देऊन शासनाच्या अध्यादेशानुसार फुलेनगर येथील नागरीकांना घरांची आकारणी करुन प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल बांधण्यासाठी लागणारी परवानगी देण्याचे आदेशित केले होते. मात्र येथील नगरपंचायत प्रशांसनाकडून जिल्हाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप करत फुलेनगर येथील नागरीकांना आमरण उपोषणाचा पवित्र घ्यावा लागला आहे.
