हिमायतनगर,अनिल मादसवार | पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, पंचायत समिती हिमायतनगर यांच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाले. १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत श्री परमेश्वर देवस्थानच्या सभागृहात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.


पशुपालन, दुग्ध व्यवसाय तसेच पशुधनावर आधारित ग्रामीण उद्योगांना चालना देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पहिल्यांदाच मोठ्या संख्येने या उपक्रमाला प्रतिसाद दिला. प्रशिक्षणादरम्यान पशुपालन व दुग्ध व्यवसायातील विविध बाबी, व्यवसायाच्या संधी तसेच पशुधनावर आधारित उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


उद्यापासून प्रमाणपत्रांचे वितरण – या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना १३ ऑगस्टपासून त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी याची नोंद घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेत ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान – मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेसाठी राज्य सरकारने ₹४ हजार कोटींची तरतूद केली असून, आगामी आर्थिक वर्षात त्यापैकी ₹५०० कोटींचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना पशुधनावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे सहकार्याचे आश्वासन – हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या, आर्थिक अडचणी असलेल्या आणि बँकेच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पात्र लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी आवश्यकतेनुसार संबंधित बँकेत स्वतः उपस्थित राहून सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे योजना ऑनलाइन सुरू झाल्यानंतर हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र शेतकरी बांधवांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरासाठी श्री परमेश्वर देवस्थानच्या वतीने मोफत सभागृह उपलब्ध करून देण्यात आले. तसेच सहभागी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्याबद्दल आयोजकांनी देवस्थानचे विशेष आभार मानले. पशुपालनातून समृद्धी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजित हे प्रशिक्षण शिबिर तालुक्यातील पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरले.




