
नांदेड | नांदेड जिल्ह्यात सध्या पाऊस अतिप्रमाणात झाला आहे. पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पावसाळ्यामध्ये किटकजन्य आजार होतात. या आजारांपासून वाचण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.


पावसाळ्यात काविळ, गॅस्ट्रो , लेप्टोस्पायरोसीस, डिसेंन्ट्री, डायरिया तर डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, झिका असे किटकजन्य आजार होतात. या आजारामध्ये लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, अशक्तपणा, उलटी, जुलाब, ताप, पोटात कळमारून शौच येणे, अतिसार, तीव्र सतत डोके व पोट दुखी, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे, त्वचेवर पुरळ उठणे, झोप येणे आणि अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात.


नांदेड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना आवाहन


जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरीकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत साहेब, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मा. मिनल करनवाल मॅडम, नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम , नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर साहेब , नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी, जिवशास्त्र नांदेड वाघाळा महानगरपालिका डॉ राजेश्वर माचेवार साहेब यांनी केले आहे.

खबरदारी घेतल्यास किटकजन्य आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.
जलजन्य आजारापासून बचावसाठी पाणी गाळून व उकळून प्यावे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये, उघड्यावर शौचास बसू नये, ताप आपल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. किटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी घरांच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपतांना मच्छरदानीचा वापर करावा, कोरडा दिवस पाळावा, पाण्याचे डबके साचू देऊ नये, ताप आल्यास अंगावर न काढता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.



