लोहा| लोहा तालुक्यातील महाटी, चिंचोली-येळी परिसरातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस पथकाने गुरुवारी पहाटे धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत वाळू उपशासाठी वापरली जाणारी दोन इंजिने व फायबर बोटी जप्त करून त्यांना जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू होता. लोहा शहरात बिना नंबरच्या हायवा गाड्यांद्वारे उघडपणे वाहतूक होत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानुसार प्रशासनाने गंभीर दखल घेत अचानक सापळा रचत परिसरात छापा टाकला. प्रशासनाचे वाहन पाहताच वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आणि मोठी पळापळ उडाली.

पथकाने घटनास्थळी आढळलेली दोन इंजिने आणि फायबर बोटी ताब्यात घेऊन त्या जाळून निकामी केल्या. या मोहिमेत लोहा व मुदखेडचे तहसीलदार, उस्माननगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार, मंडळ अधिकारी शिवकांता पवार, तलाठी रायाजी, मोतीराम पवार, नारायण गाढे तसेच महसूल व पोलिस कर्मचारी सहभागी होते.


“अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे पर्यावरण व नदीपात्राचे प्रचंड नुकसान होत आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. अवैध व्यवसायात सहभागी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिला. महसूल विभागाच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून यामुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.


