Land sold but road missing : भुखंड विकले पण रस्ता गायब.. भाग्यनगरच्या नागरिकांसाठी बाळा पाटील यांचा पुढाकार

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांच्या निवासासाठी जागेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच भाग्यनगर परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे प्लॉट धारकांना अद्यापही योग्य असा रस्त्याचा मार्ग उपलब्ध झाला नाही.


या परिसरातील सुमारे ३०० घरे असलेल्या नागरिकांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाकडे वेळेत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष बाळा पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, रस्ता नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला वर्गाला, गरोदर महिलांना तसेच मृत्यू उत्तर अंतिम संस्कारासाठी जाण्यास देखील गंभीर अडचणी येऊ शकतात.

द्रोणागिरी नगरच्या शेजारील भाग्यनगर परिसरात सुमारे ३०० घरे बांधलेली असून, तेथे नविन घरांचे बांधकाम देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देखील येथे घरे बांधली जात आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण वसाहतीत अद्याप नियमित रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही. सदर कॉलनीचा सर्वे नंबर १९१/१ १९१/१/२ असून त्याचा एन.ए. लेआउट व नकाशा प्रशासनाकडे उपलब्ध आहे.


सध्या तेथील नागरिकांना शेजारील इतर मोकळ्या प्लॉट्समधून ये-जा करावी लागत आहे. परंतु भविष्यात या प्लॉट्सवर देखील बांधकाम झाले तर येथील रहिवाशांचा मार्ग संपूर्णपणे बंद होईल. याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, शालेय विद्यार्थ्यांवर, गरोदर महिलांवर व मृत्यू उत्तर आवश्यक कार्यांवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष बाळा पाटील यांनी नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने या कॉलनीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.




