लोहा| शालेय जीवनात पदोपदी मोठे आदर्श भेटत असतात. विद्यार्थी जीवनामध्ये स्वतःची ओळख ही यशाची पहिली पायरी असते. स्वप्न सतत बदलत असतात. स्वप्न पाहिलीच पाहिजेत. आयुष्यात मोठा आदर्श ठेवला पाहिजे ध्येय मोठी असावीत त्यादृष्टीने परिश्रमाची जोड असायला पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी होऊ असा विश्वास कंधार उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. आश्विनी जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


चितळी येथील शरदचंद्र पवार हायस्कूल शाळेत सावित्री -जिजाऊ जन्मोत्सव महोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बीबी खांडेकर होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक सूर्यवंशी, युवा नेते सौरभ लुंगारे वैभव लुंगारे, डीएसबी विभागाचे सपोउनि सदाशिव जामकर, कॉन्स्टेबल शैलेंद्र माळवदकर, श्री कुरुकवाड, श्री केंद्रे उपस्थित होते.

कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी जगताप म्हणाल्या, आई-वडिलांनंतर शिक्षक स्वतंत्र संस्कार देत असतात. माझ्या जीवनावर कुटुंबातील पालकांचे संस्कार झाले. लाजाळू, घाबरट विद्यार्थ्यांनी न्यूनगंड टाकून द्यावा स्वतःची ओळख तयार करावी. दिवसामाजी एक तरी पान अवांतर वाचन करावे. स्वप्न नेहमीच माणसाला मोठा करत असतात ती सतत बदलत असतात माणसातील दोन मनामध्ये ‘राम- रावण ‘ असतो. सत्य असलेल्या रामाची निवड करावी, म्हणजे जीवन यशस्वी होते. चांगली संगत आणि ग्रंथवाचन हे नेहमी प्रेरणादायी होत असतात.


असे त्यांनी नमूद करताना प्रारंभी जिजाऊ वंदना घेतली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक बीबी खांडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात २१ वर्षाचा शाळेचा लेखाजोखा मांडला. यावेळी भारतातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य महिलांचे जिवंत देखावे साकारण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, इंदिरा गांधी,सावित्री फुले, पहिल्या महिला डॉक्टर, वकील, किरण बेदी,ज्योतिबा फुले,सोफिया कुरैशी, प्रतिभाताई पाटील यांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी जिवंत देखावे सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव जामकर यांनी केले. आभार बब्रुवान कऱ्हाळे यांनी केले.


