नांदेड| मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नांदेड शहरासह सर्वच तालुक्यात बंद पुकारून सकल मराठा समाजाच्या वतीने या निर्दयी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मागील दोन दिवसापूर्वी मराठा समाजाच्या वतीने शासनाला अल्टीमेटम देत दोन दिवसात मागण्या मान्य करून जरांगे पाटलांचे उपोषण सोडवा अन्यथा नांदेड जिल्हा बंद ची हाक देण्यात येईल असा खरमरीत ईशारा देऊन सुद्धा सरकार च्या वतीने कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने आज नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्यात सुद्धा कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला सर्व व्यापारीवर्ग, शाळा, खाजगी शिकवणी, स्कुल बस,या सह सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद पाळण्यात आला.
काल सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व असोसिएशनला संपर्क साधुन बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. एस टी महामंडळा सह सर्वच ठिकाणी प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्यात आली.
शहरात भाग्यनगर हद्दीत काही पोलीसाकडून मराठा समाजातील युवकांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या ठिकाणी सर्व समाज एकत्र आले. आणि या कृत्याचा निषेध व्यक्त करीत आक्रमक होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार करीत वातावरण शांत करण्यासाठी समाज बांधवानी अतिशय समजदारीची भुमिका घेतली. समाज बांधवानी शहरात मोटारसायकल रॅली काढुन सर्व व्यापारी वर्गाना विनंती करीत मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्या मार्फत मागण्यांचे निवेदन देत आजच्या बंद ची शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा पुढील काळात मराठा समाज मोठ्या ताकतीने रस्त्यावर उतरेल ते सरकारला परवडणार नाही असा पवीत्रा घेतला.