Pandharpur Special Train नांदेड| वर्षातून एकदा येणाऱ्या पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सव निमित्त दक्षिण मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी विशेष रेल्वे ५ ते ७ जुलै रोजी चलवण्याचे ठरवले आहे. यात अकोला, आदिलाबाद, नगरसोलवरून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


नगरसोल – मिरज (१०७५१५) ही रेल्वे शनिवारी (५ जुलै) रात्री सात सात वाजेच्या सुमारास निघून दुसऱ्या दिवशी रविवारी (६ जुलै) दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल, तर मिरज- नगरसोल ( २०७५१६) ही रेल्वे मिरज वरून रविवारी (दि. ६) सायंकाळी ५.२५ निघून दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) सकाळी ११ वाजता नगरसोलला पोहोचेल. प्रवासात दोन्ही दिशेला रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, पंढरपूर या रेल्वेस्थानकांवर थांबतील.

अकोला – मिरज रेल्वे (३०७५०५) शनिवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता निघून दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मिरजला पोहोचेल. मिरज – अकोला (५०७५०६) ही रेल्वे मिरजवरून रविवारी (दि. ६) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास निघून दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) ४.५० वाजता अकोला येथे पोहोचेल. प्रवासात दोन्ही दिशेला वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर उदगीर, पंढरपूर रोड, रेल्वेस्थानकांवर
थांबतील.

आदिलाबाद – पंढरपूर (६०७५०९) ही रेल्वे शनिवारी (दि.५) सकाळी नऊ वाजता आदिलाबाद स्थानकावरून निघून मध्यरात्री १२.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. पंढरपूर आदिलाबाद ( ७०७५०२) ही रेल्वे पंढरपूर स्थानकावरून रविवारी (दि.६) रात्री ११ वाजता दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) दुपारी ३ वाजता आदिलाबाद स्थानकावर पोहोचेल. प्रवासात दोन्ही दिशेला किनवट, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी आदी रेल्वेस्थानकांवर थांबतील.
