नांदेड| भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम नांदेड तालुक्यातील नांदुसा येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या भाषणांना प्रोत्साहन दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांचे भविष्य, आवडीनिवडी आणि उद्दिष्टांबाबत प्रश्न विचारले. त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व समजावून सांगताना, संविधानाच्या निर्मितीमागील प्रक्रिया, घटनेतील सदस्यांची माहिती आणि त्यातील वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. यावेळी इयत्ता तिसरीतील रुद्रमल्हार जनकवाडे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत केलेले सादरीकरण प्रभावी ठरले. त्याच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला सरपंच पूजाताई जनकवाडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गजानन जनकवाडे, भारत जनकवाडे, सदानंद जनकवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहाय्यक शुभम तेलेवार, केंद्रप्रमुख विजयकुमार धोंडगे, मुख्याध्यापक रावसाहेब पऊळ यासह सहशिक्षिका मंगल पवार, शैलेश पारसेवार, मयाताई अल्लापुरे, जयश्री पाटील, सुनिता गुड्डा, मिनाक्षी फुलारी, उदगीरे मॅडम, अंगणवाडीताई, पालक व गावकरी यांची यावेळी मोठया संख्येने उपस्थिती होती.