नांदेड| यावर्षी झालेला मुबलक पाऊस, जलसाठ्यांमधील विपूल प्रमाणातील सिंचनाचे पाणी व पाऊसासोबतच योग्य प्रमाणातील थंडीचे वातावरण यामुळे रब्बीसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक वातावरण आहे. त्यामुळे हा रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाईल यासाठी सर्व पूरक उपाययोजना करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध गावांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दौरा करून रब्बी हंगामाच्या पीक परिस्थितीची पाहणी गेली दोन दिवस केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उत्तमपूरक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एलेचपूर येथील प्रशांत दुर्गादास तीर्थे यांच्या शेतावर दौऱ्या दरम्यान भेट दिली. यावेळी त्यांनी हरभरा, ज्वारी व हळद पिकांची पाहणी केली. हरभरा पिकांमध्ये जास्तीत जास्त जैविक कीड नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल, मंडळ कृषि अधिकारी सुनिल सानप, कृषि पर्यवेक्षक चिंचूवाड, कृषि सहायक श्रीमती शिंदे उपस्थित होत्या. नांदेड तालुक्यामध्ये यावेळी हरभरा, ज्वारी व गहू पिकाखाली शेकडो हेक्टर जमीन आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या सूचना वरचेवर करण्याचे त्यांनी सांगितले.