नांदेड| मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे नांदेड जिल्हयातील प्रलंबित असलेले दिवाणी अपील व तडजोड पात्र फौजदारी अपील आभासी (ऑनलाईन) पध्दतीने विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे 30 नोव्हेंबर व 1 डिसेबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील ज्या पक्षकरांची तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी आपली प्रकरणे आपसी समन्वयातुन तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. संबधीत पक्षकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. दलजीत कौर जज यांनी केले आहे. तडजोड पात्र प्रलंबित अपील आपसी सामंजस्यातून निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणुन समोर आलेले आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढलेली आहेत.
लोक अदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे पक्षकार यांच्या सोबतच शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोक अदालतीचे हे यश लक्षात घेता आणि लोक अदालतीद्वारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरिता विशेष लोक अदालतीचे आयोजन 30 नोव्हेबर व 1 डिसेंबर 2024 रोजी केलेले आहे.
विशेष लोकअदालतीचे फायदे
जलद तडजोड आणि विवादाचे निराकरण, अंतिम आणि कार्यान्वित निवाडा, विवादांचे किफायतशीर निराकरण, कोर्ट फी चा परतावा असे लोकअदालतीचे फायदे आहेत. संबंधित पक्षकारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड या कार्यालयाचा मोबाईल क्र. 8591903626 वर संपर्क साधावा, असेही विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कळविले आहे.