नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आश्विन पौर्णिमेनिमित्त १९ आॅक्टोबर रोजी पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमात भिक्खू संघाच्या वर्षावास समापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी दिली. पौर्णिमोत्सव कार्यक्रमांतर्गत सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, भोजनदान, आर्थिक दान, दान पारमिता, भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
आश्विन पौर्णिमेला भिक्खूंचा वर्षावास कालावधी संपतो. या निमित्ताने भदंत पंयाबोधी थेरो यांचा १६ वा वर्षावास समापन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मान्यवरांचे मनोगत, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांचा समाजजागृतीपर कार्यक्रमही संपन्न होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.