नांदेड l पोलिस दलात सेवा बजावतात सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यातील जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भांडे यांनी आपल्या आईच्या तेरवीवर होणारा खर्च टाळून ५० हजार रुपयांची रक्कम सुमन बालगृहातील मुलींच्या उन्नतीसाठी मदत म्हणून दिली आहे . भांड यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नांदेड पोलीस दलातील तीस वर्षांमध्ये सेवा बजवणारे रमेश भांड हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत आहे . पोलीस दलात काम करत असताना कर्मकांडापासून दूर राहणाऱ्या भांड यांनी आपल्या मुलाच्या विवाह प्रसंगी हुंडा घेतला नाही .

वरदक्षिणा घेतली नाही. त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्येही त्यांचा नेहमीच आदर्श राहिला आहे. दिनांक 22 जून रोजी त्यांच्या मातोश्रीचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा तेरवीचा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती.

तेरावीच कार्यक्रम मोठा व्हावा यासाठी ही नातेवाईक आणि कुटुंबीयांनीही तगादा लावला होता. मात्र कर्मकांडावर विश्वास न ठेवणाऱ्या भांड आपली पत्नी आणि मुलांशी चर्चा करून आईच्या तेरावीवर होणारा खर्च टाळून या खर्चाची रक्कम समाजाच्या उपयोगासाठी यावी यासाठी त्यांनी सुमन बालगृहाचे संचालक दिनकर यांच्याशी संपर्क साधला . यासाठी पत्रकार राम तरटे यांची त्यांना विशेष मदत लाभली.

काल दिनांक पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजता भांड यांनी सुमन बालगृहातील मुलींना मिठाई देऊन मदतीचा धनादेश संचालक दिनकर यांच्याकडे सुपूर्द केला . यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भांडे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती संगीता रमेश भांड , भगिनी रेखा चंद्रप्रकाश कदम, चिरंजीव योगेश भांड यांच्यासह पत्रकार राम तरटे आदींची उपस्थिती होती. भांड यांच्या या सामाजिक उपक्रमाची पोलीस दलातून आणि समाजातूनही प्रशंसा होत असून इतरांनीही भांड कुटुंबीयांचा आदर्श घ्यावा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.