नांदेड| दि.३१ जानेवारी रोजी सीटू संलग्न घर कामगार संघटनेच्या वतीने महात्मा फुले पुतळा येथून भव्य मोर्चा काढून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयास घेराव घालून निवेदन देण्यात आले. या मोर्चात धुणी भांडी करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सामील (SITU-affiliated domestic workers march) झाल्या होत्या.

शासनाचे वतीने घरेलू कामगारांना विविध योजना अंतर्गत वेगवेगळे लाभ दिले जातात. त्यापैकी भांड्याचा संच वाटप करण्याचे काम सुरु आहे. परंतु बाह्य संस्थे मार्फत भांडे वाटपाचे काम सुरु असून दलाली व अनियमितता मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दोन हजार रुपये घेऊन भांडे व साहित्य किट वाटण्यात येत असून हा सर्व प्रकार थांबवून दोषींवर कारवाई करावी. बाह्य संस्थेचे भांडे वाटपाचे काम बंद करून शासनाने आपल्या कार्यालया मार्फत घरेलू कामगारांना व बांधकाम कामगारांना संच व किट वाटप करावी.

घरेलू कामगारांना घर मालकाच्या आधार कार्ड ची सक्ती करू नये. बोगस नोंदणी करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. सर्व योजनाचा लाभ घरेलू कामगारांना देण्यात यावा. बेजबाबदार कंत्राटी कर्मचारी यांना कार्यमुक्त करावे. नोंदणी व नूतनिकरण करण्यासाठी दररोज कर्मचारी उपलब्ध करून द्यावा. आदी मागण्यासह इतरही मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. उद्योग भवन कामगार कार्यालय येथे सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड आणि अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी घणाघाती भाषणे केली.

या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.सुंदरबाई वाहूळकर, कॉ.शिल्पा साबळे,कॉ.शोभा सरोदे, कॉ. रत्नाबाई सरोदे,कॉ. छायाबाई कंधारे आदींनी केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.मंगेश वट्टेवाड,कॉ. रमेश गायकवाड, कॉ. बालाजी पाटील भोसले,कॉ. सुभाषचंद्र गजभारे आदींनी प्रयत्न केले तर सामाजिक कार्यकर्ते सुनील अनंतवार यांनी घेराव अंदलनास पाठिंबा दिला.

यावेळी सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख यांनी मोर्चा च्या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित होऊन घरेलू कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या व संघटनेचे निवेदन स्वीकारले आणि स्थानिक मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी घरेलू कामगारांनी गगनभेदी घोषणा देत उद्योग भवन परिसर दणानून सोडला होता.