नांदेड| पंचमुखी हनुमान मंदिर परिसर,श्रीबागेश्वर धाम कार्यालय, गणेश नगर, नांदेड येथे श्री वराह स्वामी जयंती मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात साधू-संत, मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सामूहिक हनुमान चालीसाचे गजर घुमला आणि वातावरण भक्तिमय झाले. यावेळी भजन संधेचे आयोजनही करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला.



श्री वराह स्वामी जयंतीचे औचित्य साधून पंचमुखी हनुमान मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती. मंदिर परिसरात आकर्षक फुलांच्या तोरणांनी केळीच्या घडांची सजावट करण्यात आली होती. सर्वप्रथम विधिवत पूजा-अर्चा व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. त्यानंतर उपस्थित साधू-संत, गुरु महाराज व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी एकत्रितपणे घेतलेल्या सामूहिक हनुमान चालीसा पठणामुळे मंदिर परिसरात पवित्र वातावरण निर्माण झाले.



“जय हनुमान ज्ञान गुण सागर…” या गजरांनी भक्तांना एक विलक्षण आध्यात्मिक उर्जा मिळाली. यावेळी आयोजित भजन सांधेचाही सर्व भक्तांनी आस्वाद घेतला, यामध्ये एकापेक्षा एक उत्तम भजने सादर करण्यात आली. कार्यक्रमात भाविक, महिला मंडळे, युवक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उत्सवानंतर भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी मंदिर परिसरात धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.



विशेषतः श्री बागेश्वर धाम आयोजित सर्व कार्यक्रम आणि श्री वराहस्वामी जयंतीचा कार्यक्रमही प्लास्टिक मुक्त, हे ध्येय समोर ठेवून केळीच्या पात्रावर भोजन देऊन आणि कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घेत पर्यावरण पूरक कार्यक्रम पार पडला. गेल्या पंधरा दिवसापासून नियोजन होत असलेल्या या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री बागेश्वर धाम सेवा समिती नांदेड यांनी केले. समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक भक्तगण यांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले. अशी माहिती श्री बागेश्वरधाम सेवा समिती चे जिल्हा संयोजक संदीप कराळे पाटील यांनी दिली




