नांदेड| राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजस्थान राज्यात जयपूर येथे 7 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत केले आहे. या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी खुल्या गटाची राज्य निवड चाचणी घेतली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याचे प्रयोजन आहे. या निवड चाचणीसाठी क्रीडापटूंनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
इंडियन असोसिएशनद्वारा ऑलिम्पिक अॅडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडहॉक समिती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. महिला व पुरुष गटासाठी पुणे येथील आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. चाचणी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी श्री कसगावडे मो.नं. 9422518422 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड कार्यालयाने केले आहे.
माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी उद्या नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे माळेगाव तीर्थक्षेत्राला २५ डिसेंबरला दुपारी 2 वा. आढावा बैठक घेणार आहेत. सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माळेगाव येथे बोलवण्यात आले आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव येथील यात्रेला 29 तारखेपासून सुरूवात होणार आहे. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत विविध आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या परंपरेनुसार व निर्धारीत हे कार्यक्रम होणार आहेत. तथापि या ठिकाणी येणाऱ्या लाखोच्या संख्येतील श्रद्धाळू भाविक व यात्रेकरूंचा ओघ बघता प्राथमिक सुविधा चौख असाव्यात यासाठी हे आयोजन असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी यासंदर्भात संबंधित सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अडचणीतील महिलांनी निवाऱ्यासाठी महिला राज्यगृहाशी संपर्क साधावा
निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा व पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेत आहे. अशा महिलांनी न बिचकता शासनाच्या सुविधांचा वापर करावा व निवाऱ्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्य गृह नांदेड येथील अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रित व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. 18 ते 60 वर्षापर्यंतच्या निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिला यांना याठिकाणी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. संबंधित महिलांनी किंवा अशा पद्धतीच्या गरजू महिला लक्षात आलेल्या कोणत्याही नागरिकांनी यासाठी अशा महिलांना मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या या हक्काच्या शासकीय निवाऱ्याची सोय स्वत:साठी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह हॉटेल भाईजी पॅलेजच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डानपूल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 02462-233044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे.