नांदेड| ‘बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे, वेली, पशू-पाखरे यांच्या गोष्टी करु’ या गदिमांच्या निसर्ग कवितेप्रमाणे विविध शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते.
चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात विविध प्रकारची पिके, झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुजगोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. या अंतर्गत दफ्तरविना शाळेचे आयोजन करुन विविध अध्ययन अनुभव देता येतात. पर्यावरणाशी सन्निकटता साधत आणि त्या माध्यमातून ज्ञान विज्ञानाचा अभ्यास करीत जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला.
मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता, मिमीक्री, प्राण्यांचे हुबेहुब आवाज, नाट्य संवाद, विनोद, चुटकुले, मनोरंजक व मैदानी खेळात सहभाग घेतला. तसेच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, वापरण्यात येणारी पारंपारिक अवजारे व शेतीच्या पारंपारिक तथा आधुनिक पद्धती यांची प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्यात आले. विविध इयत्तांच्या व विषयांच्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून शाळेतील शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभती दिल्या. शेतीविषयक हंगाम निहाय नियोजन, भविष्यातील शेती आणि इंटरनेट शेतीची माहिती या विषयावर विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर आणि मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी निरीक्षणात्मक अभ्यास केला. निसर्ग शाळेत एकूण ५७ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
शिक्षकांनी शेती करण्याच्या जुन्या नव्या पद्धती व अवजारे यांच्याविषयी माहीती दिली. बैठे व मैदानी खेळ, मनोरंजक खेळ घेतल्यानंतर हिरव्यागार वनराईच्या संगतीत खिचडी – भजे, पापड, जिलेबी यांसह रानभाज्यांचा पुलाव व विविध प्रकारची फळे या विशेष माध्यान्ह भोजनावर ताव मारला. त्यानंतर सर्व निरिक्षणे नोंदविण्यात आली. अनुभव कथन या सदरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेतकरी परिवाराचे आभार मानून निसर्ग शाळेची सांगता झाली. सदरील उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक जी. एस. ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक एस.एम. घटकार यांनी केले होते. तर मनिषा गच्चे, हैदर शेख, मारोती चक्रधर, रतन टिमके, सखू चक्रधर, रेणुका टिमके, नंदिनी टिमके, माधव टिमके आदींनी परिश्रम घेतले.
काय पाहिले?
सौर ऊर्जा पॅनल आणि त्याची कार्यपद्धती औषधीयुक्त वनस्पती, लघु शेती प्रकल्प, पाण्याचे विविध स्त्रोत, रब्बी हंगामातील जोंधळा, मक्का, भुईमुग, गहू, गवत, हरभरा, हळद आदी पिकांची शेते, विविध फळांची झाडे, मातीचे प्रकार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच कालव्याद्वारे पाणी पुरवठा, पाटाचे पाणी, गांडूळ खत प्रकल्प, रानटी झुडपे, वृक्ष-वेली, विविध पक्षी आणि त्यांचे आवाज, घरटी, विविध रानभाज्या आदीं बाबींचे निरीक्षण करण्यात आले. तसेच शेंगा, बोरं, ऊसाची टिपरे, पाडाचे पेरु, मधमाशांचे पोळे या रानमेव्यांचा आस्वाद घेतला.